प्रयोगशील शेतीची पुणे कृषी उपसंचालक यांचेकडून पाहणी

46
चंद्रपूर, दि. 24 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस व भ्रदावती येथे आफ्रिकन टॉल वाणाचे मका चारा पीक, हळद शेती, हरभरा व भाजीपाल्याच्या प्रयोगशील शेतीला पुणे कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक माणिक त्र्यंबके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ उदय पाटील, कृषी उपसंचालक तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी नुकतीच भेट देवून पाहणी केली.
घुग्गुस येथील प्रदीप नत्थुजी जोगी यांचे शेतावर आत्मा अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारा अनुदानीत आफ्रिकन टॉल वाणाचे मका चारा पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली. तसेच आत्मा अंतर्गत चांदा ते बांदा योजनेद्वारा अनुदानीत सोलर लाईट ट्रॅप, भाजीपाला लागवड, दुग्धव्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन तसेच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत प्रस्तावित जावा सित्रोनेला सुगंधी औषधी तेल उत्पादन नियोजित प्रकल्पाची पाहणी करण्यात आली व शेतकऱ्यांना कृषीविभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी (बु.) येथे गटशेती योजने अंतर्गत लाभार्थी गट भूमिपुत्र शेतकरी बचत गट नंदोरी हळद प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली असता गटाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, यांनी प्रकल्पातील राबविण्यात आलेल्या घटकाबाबत माहिती दिली. प्रकल्पात खरेदी करण्यात आलेल्या औजार बँक, हार्वेस्टिंग यंत्र, हळद उखळणी यंत्र, हळद पॉलिशर, गोडाऊन, हळद प्रक्रिया उद्योग, रेफरव्हॅन, मिनी ट्रॅक्टर, BBF प्लांटर, 60 टक्के अनुदानावर खरेदी करण्यात आलेले आहे. प्रकल्पाला एकूण रुपये 1 कोटी 10 लाख खर्च आलेला आहे. शेतातील प्रक्रिया केलेला शेतमाल विक्री करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गा लगत विक्री केंद्र (मॉल) उभारण्याचा मानस गटाचा असल्यचे श्री. जिवतोडे यांनी सांगितले.
फलोत्पादन शेतकरी सुधाकर जिवतोडे, मौजा नंदोरी यांनी भाऊसाहेब फुंडकर योजने अंतर्गत लागवड केलेल्या फळबाग लागवड व बाजारपेठ बाबत कृषी उपसंचालक श्री. त्र्यंबके साहेब यांच्याशी चर्चा केली.
प्रयोगशील शेतकरी सुनील उमरे, यांनी ऊसामध्ये हरभरा व जवस पीक तसेच BBF यंत्राद्वारे हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली त्याबाबत माहिती दिली.
मधमाशीपालन शेतकरी दत्तू येरगुडे, पिरली यांनी मधमाशी पालन व्यवसायबाबत त्यांचे अनुभव व्यक्त केले. मध (सहद) बाजारपेठ व विक्री व्यवसाय बाबत चर्चा करण्यात आली.
सदर प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाला यावेळी कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, श्रीमती खिल्लारी, अमर वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा आर. टी. जाधव, पंचायत समिती सभापती प्रविनभाऊ ठेंगणे तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती चे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी पी जी कोमटी, मं कृ अ चंदनखेडा, श्री सुतार, कृ अ,भद्रावती, पी एम ठेंगणे, एस सी हिवसे, कृषी सहायक जे बी नेहारे, ए. जी. वाकळे, वाय. एन. शिंदे, कु. मिसाळ, जी. यु. कवारखे आणि शेतकरी उपस्थित होते.