रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद होणार

99

पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणा-या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केले आहे. यामुळेच रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास येत्या १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक शंभर टक्के लिंक करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे एकूण 13 लाख 32 हजार 871 ऐवढे लाभार्थी आहेत. यापैकी आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 (79.66) टक्के इतक्या लाभार्थ्यांचे आधार लिंकीग पूर्ण झाले आहे. अद्याप ही सुमारे तीन लाख पेक्षा अधिक लाभार्थीचे आधार लिंकीग पूर्ण झालेले नाही.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. याकरीता रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ekYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. याकरिता दि ३१ जानेवारी २०२१ पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे १०० % आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दीष्टाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ११ परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविणेत येत आहे. त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्दारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्यात येणार आहे.

याबाबत आधारसिडींग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करणेत आलेली असुन दि ३१ जानेवारी २०२१ पुर्वी या लाभाध्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग करण्याचे निर्देश ११ परिमंडळ कार्यालयांना देणेत आलेले आहेत.