आम्ही सावित्रीच्या लेकी

51

आज 3 जानेवारी. भारताच्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती. भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून सावित्रीबाई फुले यांचा नावलौकिक आहे. समाजाच्या प्रथा आणि रुढींच्या साखळदंडात अडकून पडलेल्या स्त्रियांना शिक्षणरूपी गंगेच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोलाचे आहे.

भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका त्या ठरल्या.युगपुरुष महात्मा जोतिबा फुले यांच्यासारख्या पतीच्या सहवासाने त्यांनी महिला शिक्षणाचा श्रीगणेशा केला. त्यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षांपासून अक्षरओळख करून घेतली. त्या साक्षर झाल्या. जोतिरावांच्या मनात स्त्रीशिक्षणविषक विचार प्रबळ होऊ लागला. तेव्हा स्त्रियांना कसे शिकवावे, हा एकच विचार त्यांना शांत बसू देईना. परंतु हार मानतील त्या सावित्रीबाई कसल्या. अध्यापनाचा वस्तुपाठ घेण्यासाठी त्या काही दिवस अहमदनगरला जाऊन राहिल्या. त्यानंतर जोतिरावांनी समाजाची दशा व दिशा त्यांना समजावून दिली आणि खऱ्या अर्थाने हा इतिहास सुवर्णाक्षरामध्ये लिहिण्यास प्रारंभ झाला. स्त्रियांमध्ये शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्याचा वसा त्यांनी घेतला.

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनी चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

असे म्हणत मानवी मनातील दानवी वृत्तीवर शिक्षणरूपी प्रहार त्यांनी केला. आज पावणेदोनशे वर्षे उलटली तरी सावित्रीबाई फुले यांचा वारसा दिवसेंदिवस समृद्धच होत चालला आहे. 2020 उलटले मात्र करोनाचे भयंकर समजले जाणारे हे वर्षही सावित्रीच्या लेकींनी गाजविले. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गेल्या वर्षभरात आपल्यातील असामान्य कर्तृत्वाने आदर्श निर्माण करणाऱ्या सावित्रींच्या लेकींची यशोगाथा-

स्मिता झगडे
मायानगरी मुंबईत करोनाने हाहाकार माजविला. त्यावेळी पोटाच्या खाचखळग्यांसाठी एक महिला मोठ्या हिमतीने रस्त्यावर टॅक्‍सी चालवीत होती. स्मिता झगडे त्या महिलेचे नाव. मुंबईत गेली 7 वर्षे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण त्या देत होत्या. करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा रोजगार बुडाला. 3 महिने कुठलीही कमाई नाही. एकल पालकत्वाची जबाबदारी सतत सतावत होती. परंतु तिने हार मानली नाही. इतरांना चारचाकीचे धडे देणारी ती स्वतः चारचाकी घेऊन मुंबईच्या रस्त्यावर दिसू लागली. इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्‍सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांनी त्यांना हे बाईचे काम नाही, यात पडू नये असे सल्ले दिले. पहिल्याच दिवशीच्या कमाईने तिचा आत्मविश्‍वास वाढला. आज तिने तो व्यवसाय जिद्दीने करीत महिला वर्गापुढे आदर्श ठेवला आहे. लोक काही म्हणो, आपण मागे हटायचे नाही हा सावित्रीबाईंचा दुर्दम्य आशावाद स्मिता हिने आपल्या कृतीतून जिवंत ठेवला.

सरिता गायकवाड
गुजरातमधील डांग जिल्ह्यातील अंबा सारख्या दुर्गम गावात जन्मलेली सरिता गायकवाड नावाची एक मुलगी, जिने आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेचा ध्यास घेतला. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक सोयीसुविधा तिच्याकडे नव्हत्या. गावात रस्ता नाही, मोबाइलला रेंज नाही, प्रवासासाठी पाच-सहा किमीची पायपीट करावी लागत असे. परंतु या परिस्थितीवर मात करून कोणतेही कारण न देता तिने ऍथलेटिक्‍समध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. आंतराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत आशियाई स्पर्धेत 4400 मीटर टीम रिलेमध्ये सुवर्णपदकही मिळविले होते. नुकतीच तिची गुजरातमध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्‍ती झाली आहे. आवश्‍यक साधने उपलब्ध नसतानाही ध्येय समोर ठेवून मार्गक्रमण करण्याचा सावित्रीबाई फुलेंचा वारसा तिने तेवत ठेवला.

किरण कुर्मावार
गडचिरोलीतील दुर्गम भागात राहणाऱ्या किरणला उच्च शिक्षण घेऊन आईबाबांसाठी काहीतरी करायचे होते; परंतु दुर्दैवाने वडिलांचा अपघात झाला आणि तिचे स्वप्न धूसर झाले. उच्चशिक्षण घेऊन गगनभरारी घेण्याची स्वप्नं पाहणाऱ्या किरणवर वडिलांच्या अपघातामुळे त्यांची टॅक्‍सी चालवायचं काम हाती घ्यावं लागलं. गडचिरोलीतील रेगुंठा या नक्षलग्रस्त भागात तिने टॅक्‍सी चालवायला सुरुवात केली. ज्याठिकाणी सार्वजनिक वाहनांचे दर्शनही दुर्मिळ आहे अशा भागात किरण मोठ्या जिद्दीने टॅक्‍सी चालवून लोकांना प्रवासाचे साधन मिळवून देत आहे. नक्षलग्रस्त आणि अभावग्रस्त भागातील पहिली महिला टॅक्‍सीचालक म्हणून नुकतीच तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकार्डसनं घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तडजोड न करता परिस्थितीला झुकविण्याचा सावित्रीबाईंचा निधडा धडा किरण आज अभिमानाने गिरवत आहे.

आज या तिघींप्रमाणे हजारो महिला आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणत परिस्थितीपुढे न झुकता परिस्थितीला झुकवत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी ओलांडलेली सामाजिक विषमतेची रेषा आजच्या स्त्रीच्या प्रगतीसाठी आदर्शवत ठरत आहे. आज देशातील तमाम महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाचा आदर्श घेत प्रगतीची शिखरे काबीज केल्यास खऱ्या अर्थाने महिलाशक्‍तीचा जागर असेल.