चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूर येथे एका ट्रॅक्टरला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून कारमधील चार जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतकांमध्ये 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश असून हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
दर्शना उधवाणी (25), प्रगती निमगडे (24), मोहम्मद अमन (23) आणि स्मित पटेल (25) अशी मृतकांची नावं असून योग गोगरी (23) हा अपघातात जखमी झालाय. योग गोगरी चा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे 5 ही जण काल रात्री चंद्रपुर मार्गावरील एका हॉटेल मध्ये आले होते. रात्री उशिरा परत जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला. त्यावेळी भरधाव असलेल्या कारने ट्रॅक्टरला धडक दिली. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मूल शहरात शोकाकुल वातावरण आहे.
चंद्रपूर-मूल मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित होत असल्याने मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. सध्या हा मार्ग विस्कळीत असून यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील उच्चभ्रू घरातील 4 युवक-युवतींचा असा अचानक मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.