आरोग्य विभागाकडून क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी मोहीम

70

आरोग्य विभागाकडून क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी मोहीम

मुल – प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 डिसेंबर 2020 पासून ते 16 डिसेंबर 2020 पर्यंत मुल तालुक्यातील सर्व वयोगटातल्या नागरिकांची क्षयरोग शोध मोहीम तसेच कुष्ठरोग शोध मोहीम पंधरवाडा उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मुलचे वतीने राबविण्यात येत आहे.
सदर मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करून त्यांचे वर उपचार करण्यात येत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे क्षयरोग रुग्ण शोधण्याचे प्रमाण कमी झालेले असून याचा विपरीत परिणाम समाजावर तसेच शासनावर पडत असल्याने केंद्र शासनाने संपुर्ण भारत देशाला 2025 पर्यंत क्षय मुक्त करण्याचे धोरण आखले आहे.
सदर विशेष मोहिमेसाठी उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून तालुक्यात 1,23,301 एकूण लोकसंख्या असून त्यांची तपासणी करण्यासाठी 89 प्रशिक्षित पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सतर्कता बाळगत मोहिमेदरम्यान तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मोफत तपासणी करण्याचे आवाहन मुलचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे, उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. उज्वल इंदुरकर, क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक सुहास पिंपळे, क्षयरोग उपचार पर्यवेक्षक जगदिश निमगडे, निम वैद्यकिय कर्मचारी प्रमोदसिंह बघेल, कुष्ठरोग तंत्रज्ञ अरुण कावटी यांनी केले आहे.

क्षयरोगाचे लक्षणे
👉🏻 १) दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला
👉🏻 २) दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ ताप
👉🏻 ३) वजनात लक्षणीय घट
👉🏻 ४) भूक न लागणे
👉🏻 ५) मानेवर येणाऱ्या गाठी

कुष्ठरोगाचे लक्षणे
👉🏻 १) अंगावरील फिक्कट लाल संवेदना रहित चट्टा.
👉🏻 २) मऊ व चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावरील गाठी.
👉🏻 ३) हातापायांमध्ये बधिरता तसेच शारीरिक विकृती