गोरगरीब निराधारांना शाळेकडून मदतीचा हात

43

मूल तालुक्यातील श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल जुनासूर्ला कडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत डो. वि.रामटेके यांच्या स्मृतीदिनानिमित्त गावातील गोरगरीब, निराधार गरजू व्यक्तिंना ब्लॅंकेटचे वाटप करून दिवंगत संस्थापक अध्यक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेले दिवंगत डो. वि.रामटेके यांनी सामाजिक कार्याची आवड जोपासत, परिस्थितीशी दोन हात करत सन १९८४ मध्ये जुनासूर्ला या स्व-गावी माध्यमिक शाळेची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा निर्माण केली. सोबतच अनेक गरजूंना मदतीचा हात दिला. आयुष्यभर सेवाभावी वृत्ती जोपासत स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली. स्वतःची किंवा स्वतःच्या कुटुंबाची तमा न बाळगता सामाजिक व शैक्षणिक कार्यांसाठी प्रज्वलित झालेली ही ज्योत सन २०/११/२०१० मध्ये मावळली.
आज त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शाळेकडून गोरगरीब निराधारांना मदतीचा हात देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोबतच शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करुन वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला.
योगिराज श्री विक्तुबाबा शिक्षण संस्था जुनासूर्ला अध्यक्ष सिद्धार्थ रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सुधीर गोवर्धन, सहसचिव किशोर दुधे, शाळेचे मुख्याध्यापक बंडु रोहणकर, शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.