कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण आणि बीज प्रक्रिया करण्याच्या सुधारित पद्धती याबाबत मार्गदर्शन

28

मुल: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि महाविद्यालय,मुल येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि संशोधन केंद्र, सोनापूर भागातील इंदाळा येथील शेतकऱ्यांना सुधारित माती परीक्षण व बीज प्रक्रिया या विषयी प्रात्यक्षिक दिले. माती परीक्षण व बीज प्रक्रिया का करावी, त्यांच्या योग्य पद्धती कुठल्या व त्यापासून होणारे फायदे या सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली.
कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की जर आपण आपल्या मातीचे परीक्षण केले तर आपल्याला आधीच माहिती पडेल की आपल्या मातीमध्ये कुठले पोषक अन्नद्रव्ये किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे व नंतर आपण त्यानुसार आपल्या मातीमध्ये कमी असलेले व पिकाला गरज असलेले पोषक अन्नद्रव्ये खताद्वारे पिकाला उपलब्ध करून देऊ शकतो. बीजप्रक्रिया म्हणजे बियाणे, रोपे किंवा वनस्पतींवर भविष्यात हल्ला करणाऱ्या रोगकारक बुरशी, जिवाणू आणि कीटक यांच नियंत्रण करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यांवर जैविक खते, परपोषी जिवाणू आणि बुरशी यांची केलेली बीज प्रक्रिया. भौतिक आणि जैविक बियाणे उपचार केवळ रसायनांना पर्यायी किंवा रासायनिक उपचारांच्या संयोगाने त्यांच्या पर्यावरणीय सुरक्षा आणि सामाजिक आर्थिक पैलूंमुळे जगभरात वापरले जात आहेत. जैविक बियाणे उपचार हे भविष्यात सर्वात वेगाने वाढणाऱ्या बीज प्रक्रिया क्षेत्रांपैकी एक असण्याची अपेक्षा आहे, कारण त्यांची नोंदणी करणे सोपे तसेच निसर्ग निर्मित आहे, शेतकरी मित्रांना याबाबत जागरूकता असणं हे रोग व्यवस्थापनातील मर्यादित घटकांपैकी एक आहे. यामध्ये या कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना धान बीजांवर ३ टक्के % मीठ व पाण्याचे द्रावण व जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा विरिडी चा प्रत्यक्ष वापर करून दाखविला आणि महत्व पटवून दिले. या प्रमाणे प्रक्रिया केल्यास, बियांमध्ये अंकुरण क्षमता वाढते व बियांवर जैविक बुरशीनाशकचा वापर केल्याने ग्लायटॉक्सिन व विरेडीन नावाचे प्रतिजैविक निर्माण करते व ती रोगकारक बुरशीना मारक ठरते व ते पर्यावरणास कसे सुरक्षित ठरते, आर्थिक दृष्ट्यांनी ते कसे स्वस्त असते आणि कसल्याही सूक्ष्मजीवांना हानिकारक नसते या बद्दल प्रकाश टाकला आणि शेतकरी मित्रांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान केले. अशाप्रकारे कृषिकन्यांनी माती परीक्षण व बीज प्रक्रिया करण्याचे फायदा शेतकऱ्यांना पटवून दिले.
यावेळी शेतकरी अरुण गुरणुले, संदीप जेंगठे, जीवनराव चौधरी, धीरा दुर्गेवार, विकास जेंगठे, सुमित्रा नानाजी जेंगठे आणि इतर शेतकरी उपस्थित होते. कृषिकन्या पल्लवी चौधरी, मंजुश्री कांबळे, सिल्विया पाटील, कोमल कोडापे यांना कृषि महाविद्यालय, मुल येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे व डॉ. युवराज खोब्रागडे प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, सोनापूर यांच्या पूर्वनियोजित मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या करून दाखविण्यासाठी लाभ मिळाला. तसेच कृषिशास्त्रज्ञ मोहिनी पुनसे, मृदा विशेषतज्ञ डॉ. अक्षय इंगोले, वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. राहुल चहांदे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रविणा बरडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अश्विनी गायधनी आणि डॉ. स्वप्नील देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.