शेतकऱ्यांना निंबोळी अर्क फवारणी मार्गदर्शन

32

मुल: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुल येथील कृषिदुतांनी कोटगल (जि. गडचिरोली) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमाव्दारे निंबोळी अर्क फवारणी याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. निंबोळी अर्क म्हणजे कडूलिंब या झाडाच्या बियांपासून (निंबोळ्या) काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले अझाडिराक्टीन कीटकनाशकाचे काम करते. या निबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडीवर हवा तो परिणाम होतो. मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे, पाने पोखरणाच्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या, फळ माश्या, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो. व त्यांचा बंदोबस्त होतो. तसेच निंबोळी अर्काची फवारणी ही रासायनिक कीटकनाशकासारखी बाधक नसून पिकांसाठी फायदेशीर असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फवारणीचा वापर शेतीसाठी करावा असे कृषिदुत ओम शिंदे, रेवत ढोक, कुणाल शेंडे, उज्वल दखने, मयूर जंगिलवार या कृषिदूतांनी मार्गदर्शन केले.