महाभरती अंतर्गत उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम परत होणार

45

चंद्रपूर, दि. 20 : जिल्हा परिषद चंद्रपूरच्या आस्थापनेवरील गट- क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्यास माहे मार्च 2019 मध्ये तसेच ऑगस्ट 2021  मधील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाची पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली जाहिरात व संपुर्ण भरती प्रक्रिया शासन निणयान्वये रद्द करण्यात आली असून जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे  शुल्क परत करण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

    उपरोक्त परिक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी दि. 5 सप्टेंबर 2023  पासून लिंक सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर येथे  एकुण 21391 उमेदवारांनी अर्ज केले असून आज तारखेपर्यंत फक्त 3857 उमेदवारांनीच परीक्षा शुल्क परत मिळणेकरीता संकेतस्थळावर माहिती भरलेली आहे. तेव्हा संबधित जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी परिक्षा शुल्क परत मिळविण्याकरिता सदर संकेतस्थळावर अचूक माहिती भरावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.