श्रमसंस्कार छावणी शिबिरात देशभरातील अडीचशेंवर शिबिरार्थ्यांचा सहभाग

36

मूल (चंद्रपूर) : गर्द वनराईने फुललेल्या शांत आणि निसर्गरम्य तालुक्यातील सोमनाथलगतच्या बाबा आमटे यांनी निर्माण केलेल्या कुष्ठधामात ५५ व्या श्रमसंस्कार छावणीला सुरुवात झाली असून २२ मे रोजी छावणीची सांगता होणार आहे. ज्येष्ठ कर्मयोगी बाबा आमटे स्थापित महारोगी सेवा समिती, वरोरा यावर्षी ७५ वर्षे पूर्ण करत असताना समाजासमोर उभ्या असणाऱ्या विविध प्रश्नांना समोर ठेवून कामाच्या दिशेची आखणी करत आहे. त्या अनुषंगाने छावणीची संकल्पना जुनीच असली तरी तिचे नियोजन मात्र नव्या पद्धतीने करण्यात आले आहे. यात यावर्षी सामान्य व्यक्तींसोबत कर्णबधिर व्यक्तींना
समायोजित करून घेण्यात आले आहे. अडीचशेंवर शिबिरार्थी या श्रमसंस्कार छावणीत सहभागी झाले आहेत.
छावणीचा शुभारंभ महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे व तामिळनाडू येथील ‘भारत जोडो’ यात्रेतील सहयात्री मुदलवन यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आला. पल्लवी आमटे यांनी आपल्या भाषणातून सर्व शिबिरार्थ्यांचे स्वागत केले व नियोजनाची मांडणी केली. ५५ व्या श्रमसंस्कार छावणीमध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, ओडिशा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यातील २५० च्या वर शिबिरार्थी सहभागी झाले असून ६० कर्णबधिर शिबिरार्थी आहेत. शिबिरात सहभागी कर्णबधिर व सामान्य शिबिरार्थ्यांनी छावणीच्या नवीन रूपाचे आनंदाने स्वागत केले. शिबिराच्या आठ दिवसांत कर्णबधिर व सामान्य शिबिरार्थ्याचा सहप्रवास सोपा व्हावा, यासाठी सांकेतिक भाषेचे धडे देण्यात येणार आहे.
समाजाने नाकारलेल्या कुष्ठमुक्त मंडळींनी गेल्या ७५ वर्षांत उभ्या केलेल्या सतरंजी निर्मिती, माती व लाकूडकाम, रोपवाटिकेचे निर्माण, हातमाग, फेब्रिकेशन काम, पर्यावरणपूरक काम आदी विविध विभागांचे मॉडेल उभे करून छावणीच्या सात दिवसांच्या काळात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासोबतच त्या-त्या विभागांची ओळख व्हावी. तसेच ज्यांनी आपल्या वेदनांवर यशस्वीपणे मात करून हे सर्व विभाग शन्यातन उभे केले असे
कुष्ठमुक्त, अंध, अपंग, दिव्यांग बांधवांची गाथा युवापिढीला वाचता व बघता येऊन त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी नव्या उमेदीने पुढील आयुष्याकडे बघावे व जगावे, यासाठी त्यांच्याशी संवाद व चर्चा करण्यात येणार आहे, ही सगळी कामे करताना खूप समाधान मिळाल्याची भावना शिबिरार्थी व्यक्त करीत आहेत.
छावणी काळात सहभागी युवापिढीला विविध विषयांचा अभ्यास व्हावा, यादृष्टीने उद्बोधन सत्र ठेवण्यात आले आहे. डॉ. विकास आमटे यांनी आनंदवन प्रयोगवन, डॉ. सोमनाथ रोडे यांनी ‘बाबा आणि युवक’ तर डॉ. अशोक बेलखोडे यांनी ‘भारत जोडो’ अभियानातील अनुभव कथन केले आहे. डॉ. मंदार परांजपे यांनी ‘नको सुपारी हवा विडा’ या आगळ्यावेगळ्या विषयांमधून युवापिढीला नवी दिशा दाखविण्याचे काम केले आहे. छावणीच्या यशस्वितेसाठी सोमनाथ येथील प्रकल्पप्रमुख अरुण कदम, पल्लवी आमटे, राम राठोड, शिबिर समन्वयक रवींद्र नलगंटीवार सहकार्य करीत आहेत.