पोलिंग पार्टी रवाना, मतदारांमध्ये उत्सुकता@बल्लारपुर विधानसभा मतदार संघात प्रशासन सज्ज

29

मूल : लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आटोपून आता १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून लगबग सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांमध्ये पोहोचून उद्या होणाऱ्या मतदानासाठीची व्यवस्था करत आहेत.मतदानासाठी निवडणुकीचं साहित्य घेऊन मतदान अधिकारी दाखल होत आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे. 

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर, पोंभूर्णा आणि मूल तालुक्यातील एकुण 361 मतदान केंद्रावर 1444 मतदान अधिकारी आणि कर्मचारी सुखरूप पोहोचले असून प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणुक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. मूल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर येथील तहसिलदार यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी सहायक म्हणून सहकार्य करीत असल्याने मतदानाची प्रक्रिया अडचणीविना शांततेत पार पडणार आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामधून 1444 अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळया वाहणांने मतदार संघातील 361 मतदान केंद्रावर पोहोचले असून राखीव असलेले 144 कर्मचा- यांचे 36 मतदान पथक मतदानाची प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 750 पोलीस व होमगार्ड कर्मचारी सुध्दा शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. 42 झोनल अधिकारी 361 मतदान केंद्रावर लक्ष ठेवणार आहेत. होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 1 हजार 242 मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एकुण मतदारांपैकी केवळ 242 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नव मतदार असलेल्या 4326 युवा मतदारांपैकी किती मतदार लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा अधिकार पहिल्यांदा पार पाडतात. हे ही तेवढेच महत्वाचे राहणार आहे.

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. प्रत्येक उत्सव आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो. यावर्षी सुद्धा लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो. या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे.

भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  प्रशासन नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबध्द आहे.

त्यामुळे येत्या 19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी होणा-या निवडणुकीत सहभागी व्हा. विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भिडपणे मतदान करा. लक्षात ठेवा मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सर्व कामे बाजुला ठेवून कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम

लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नवमतदारांमध्ये विशेष उत्साह असल्याचे चित्र आहे.निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याअगोदरपासूनच राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनीदेखील उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. याशिवाय सर्वच उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचार करत मतदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.