चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

48

औद्याेगिक नगरी असलेल्या चंद्रपुरची कन्या शारदा विजया गजानन मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा २८२ रँकने उत्तीर्ण झाली आहे. मुलीने आयएएस होण्याचे स्वप्न साकार केल्याने आईवडिलांनी आनंद व्यक्त केला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक तथा जिल्हा विकास प्रबंधक तथा कवी, लेखक गजानन मादे्शवार यांची शारदा ही मोठी मुलगी.

येथील कार्मेल अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगलीच्या वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथून बिटेक पर्यंतचे शिक्षण घेतले.

बालपणापासून आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शारदाने बिटेकची परीक्षा उत्तीर्ण होताच दिल्लीत राव स्टडी सर्कल या ॲकेडमीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाचे क्लासेस लावले होते.

तिथे नियमित अभ्यास करून आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शनही घेतले. सलग चार वर्षे राव ॲकेडमीत अभ्यास केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली.

यासंदर्भात शारदाचे वडील गजानन मादे्शवार यांच्याशी संपर्क साधला असता मुलगी देशात २८२ व्या रँकने उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. मुलगी आयएएस झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही असेही गजानन मादे्शवार म्हणाले. पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आल्यानंतरही आयएएस होण्याचे प्रयत्न मुलीने सोडले नाही. अपयशानंतरच यश मिळते या म्हणीप्रमाणे पहिले तिने प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात मुलगी यशस्वी झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आला तेव्हा मुलगी दिल्ली येथेच असल्याची माहिती मादे्शवार यांनी दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करतांना चंद्रपूर व गडचिरोलीतील जिल्हाधिकारी यांचे वेळाेवेळी मार्गदर्शन तिला मिळत राहिले. तसेच महाराष्ट्रातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांनीही तिला वेळ प्रसंगी मार्गदर्शन दिल्याचेही मादे्शवार यांनी  बोलतांना सांगितले.

विशेष म्हणजे २०२४ मध्ये चंद्रपुरातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणारी शारदा विजया गजानन मादे्शवार ही एकमेव मुलगी आहे. आयएएसची परीक्षा उत्तीर्ण करून चंद्रपूर जिल्ह्यासोबतच तिने शाळेचेही नाव मोठे केले आहे. या यशाबद्दल तिचेवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.