सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम : १२० विद्यार्थ्यांचा सहभाग

32

निसर्गभ्रमंती विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले
मूल : सामाजिक वनीकरण विभागांतर्गत राष्ट्रीय हरित सेना शाळेतील विद्यार्थ्यांची निसर्गभ्रमंती, वनभ्रमंती व निसर्ग शिबिर शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी लोकबिरादरी प्रकल्प सोमनाथ येथे पार पडले. या शिबिरात स्व. बापूजी पाटील हायस्कूल राजगड, नवभारत विद्यालय मूल, देवनील विद्यालय टेकाडी, शरदचंद्र विद्यालय भेजगाव, डॉ. आंबेडकर विद्यालय गडीसुर्ला, महात्मा फुले विद्यालय चिरोली, आनंद विद्यालय केडझर, विश्वशांती विद्यालय मारोडा
येथील साधारणतः १२० विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वन पर्यावरणाची शपथ देण्यात आली. त्यानंतर सोमनाथ प्रकल्पातील शेतीचे व नर्सरीचे दर्शन विद्यार्थ्यांना घडविण्यात आले. शिबिराचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी बी. सी. येळे, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. ए. राजुरकर, सोमनाथ प्रकल्पाच्या योगिता पाटील, डी. जी. ढवस, पीजदूरकर, पर्यावरण सखी वर्षा भांडारकर आदी उपस्थित होते. विभागीय वन अधिकारी बी. सी. येळे यांनी वनांचे महत्त्व, वनांचे क्षेत्र, विद्यार्थ्यांचे कर्तव्य याबाबत माहिती दिली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. ए. राजुरकर, वर्षा भांडारकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ढवस, संचालन नागीलवार तर आभार खरकाडे यांनी मानले. यशस्वितेसाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र मूल येथील वनपाल व्ही. एल. उगे, वनपाल एम. जी. घोडमारे, वनरक्षक ए. ए. गीते आदींनी प्रयत्न केले.