सोमनाथ येथे होणार कृषी पर्यटन केंद्र

35

सहा कोटी रुपये खर्चून उभारले जाणार केंद्र
मूल तालुक्यातील सोमनाथ येथे जिल्हा परिषदेच्या वतीने गो साधन परिसरात कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात येणार असून, यासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाकरिता तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पूर्ण प्रकल्पावर सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकरिता खनिज विकास निधीतून निधी उभारला जाणार आहे. या कृषी पर्यटन केंद्रामुळे जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या परिसरात सोमनाथ येथील वाहणारा बारमाही झरा, शासकीय कृषी महाविद्यालय, जगप्रसिद्ध महारोगी सेवा समितीचे बाबा आमटे निर्मित सोमनाथ प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प सफारी गेट असून यात कृषी पर्यटन केंद्राची भर पडणार असल्याने पर्यटकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कृषी पर्यटन केंद्रात गार्डन, किचन, कॉफी हाऊस निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती केली जाणार आहे. या केंद्राच्या
माध्यमातून शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देता येणार आहे. तर काळाच्या ओघात लोप पावत असलेल्या शेती अवजारे, शेत पिके, पाळीव जनावरांच्या जाती, प्रकार शेतकऱ्यांना शिकता येणार आहेत. मूल तालुक्यातील सोमनाथ धे होणारे कृषी पर्यटन केंद्र शेतकऱ्यांसाठी आदर्श केंद्र ठरणार असून येत्या काही
दिवसातच या केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
या केंद्राच्या उभारणीकरिता गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे बांधकाम कार्यकारी अभियंता विवेक पेंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश हिरुडकर, सहाय्यक पशुधन अधिकारी राहुल घिवे, उपविभागीय अधिकारी राजकुमार गेडाम तर शाखा अभियंता सरोज कुमार बिसेन आदींनी भेट देत जागेची पाहणी केली.