“महाडीबीटी पोर्टल’ हॅंगच @शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास अडचणींचा डोंगर

36

 राज्य सरकारच्या बहुचर्चित “महाडीबीटी पोर्टल’चा बोजवारा उडाला असून, त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहत आहेत. ऐन परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी सलग दोन ते तीन दिवस शिष्यवृत्तीचे अर्ज भरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणखी किती काळ शिष्यवृत्ती अर्ज व पोर्टल यामुळे त्रस्त राहणार याबाबत अनिश्‍चितता आहे. 
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर आणि शिक्षण फी तसेच इतर शुल्काची रक्कम विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या खात्यात जमा करण्यात येत होती. मात्र, 3 ऑगस्ट 2017 पासून विद्यार्थ्यांना देय होणारी वित्तीय लाभाची रक्कम ही संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात थेट जमा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला होता.

त्यासाठी शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी “महाडीबीटी’ हे एकत्रित संकेतस्थळ विकसित केले. हे पोर्टल https://mahadbt.gov.in कार्यान्वितही केले. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी “महाडीबीटी पोर्टल’वर ऑनलाइन अर्ज करावयाचे होते. अर्ज ऑनलाइन असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होणार होती. मात्र, पोर्टलवरील अडचणींमुळे वेळेची बचत न होता अधिक वेळ वाया जात आहे. 

एकापेक्षा अधिक योजना 
“महाडीबीटी पोर्टल’वरील योजनेसंदर्भातील माहिती शाळा आणि महाविद्यालयांनी दर्शनी भागात लावण्याबाबत आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या होत्या. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतनविषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी “महाडीबीटी पोर्टल’वर स्वतःची नोंदणी करण्याचे तसेच अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु यात पोर्टल सुरू होण्यापासूनच अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. यात पोर्टलवर एकापेक्षा अधिक विभागांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याने ताण वाढून संकेतस्थळावर सतत बंद पडत आहे. 

या आहेत अडचणी 
– संकेतस्थळावर अर्ज न येणे 
– अर्ज भरताना साइट हॅंग होणे 
– कागदपत्रे अपलोड होण्यात अडचणी 
– कागदपत्रे अपात्र ठरविणे 
– फीबाबत माहिती न दिसणे 
– अर्जात दुरुस्ती न होणे 

 परीक्षा आली असून, आमचा वेळ शिष्यवृत्ती अर्ज भरण्यात जात आहे. पोर्टलवर अनेक अडचणी असून, अर्ज भरणे त्रासदायक ठरत आहे. शासनाने पोर्टलचे काम लवकरात लवकर नीट करणे आवश्‍यक आहे.
–  (विद्यार्थिनी)