इच्छाशक्ती आणि मेहनत करीत सातत्याने पाठपुरावा केला तर यशाची दारे उघडता येतात-राठोड,संवर्ग विकास अधिकारी पं.स.मूल

33

अतिशय गरीबीच्या व हलाखीच्या परिस्थितीत बालपण घालवले असल्यामुळे गरीबांच्या वेदना काय असतात याची परिपूर्ण कल्पना आहे आणि आज या पदावरून त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी मिळाली आहे तर सर्वप्रथम गरीब व वंचित कुटुंबातील व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देत त्यांचे स्वतः चे घर असावे या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे मत मूल पंचायत समितीचे नवनियुक्त संवर्ग विकास अधिकारी बी.एच.राठोड यांनी प्रेस क्लब मूल द्वारे आयोजित (Meet the Press ) मीट द प्रेस उपक्रमात बोलताना व्यक्त केले.

मीट द प्रेस या उपक्रमाची प्रशंसा, प्रेस क्लब मूल च्या पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन व शुभेच्छा :- बि.एच राठोडसंवर्ग विकास अधिकारी पं.स.मूल.

आपला पूर्व इतिहास कथन करताना ते म्हणतात , भटक्या विमुक्त जमातींत बंजारा समाजात जन्म झाल्यानंतर आम्ही नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील छोट्या पाडावरील तांड्यावर अगदी कुडाच्या घरात बालपण घालवले , त्याकाळी शिक्षणासाठी मोठ्या शहरात वा शाळेत पाठवण्याची पालकांची परिस्थिती नव्हती त्यामुळे आश्रम शाळेत टाकले ,तिथे पहिले १२वर्षे घालवल्यानंतर नोकरीपेशा बहिण भाऊजी यांचेकडे ठाणे पालघर परिसरात आश्रय घेतला व नौकरी करीत शिक्षण पूर्ण केले.

त्यावेळी राठोड यांचे भाऊजी मंत्रालयात उच्च पदावर कार्यरत होते, त्यामुळे मग मुंबईत वांद्रे भागात राहून पुढील शिक्षणासाठी मार्ग मोकळा झाला.

खाजगी कंपनीत ३००-४००₹ एवढ्या अतिशय तोकड्या पगारात मुंबईत नौकरी मिळाली त्यासोबतच शिक्षण पूर्ण करीत स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी सुरू केली आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालो आणि सरकारी नोकरी मिळाली. मुंबईत नौकरी,करीत असतांनाच मंत्रीमहोदयांसोबत काम करण्याची संधी मिळाली

मोखाळा, पालघर, शहापूर अशा आदिवासी बहुल भागात काम करताना आदिवासी गरीब बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले ,या भागात श्रमजीवी संघटनांचे प्राबल्य असून त्यांचा सामना करीत आपले कार्य करताना प्रचंड दमछाक व्हायची हेही एका प्रश्नाच्या उत्तरात मान्य केले.

आपली कौटुंबिक माहिती देताना एक मूलगा एक मुलगी, इंजिनिअर असून ते उच्चशिक्षित असून ते त्याच भागात असतांना व बहिण भाऊजी सेवानिवृत्तीनंतर बदलापूर येथे स्थायिक झाल्याचे सांगतात ,मात्र आपले इतर कुटुंबीय नांदेड जिल्ह्यात वास्तव्यास आहेत हे स्पष्ट करतात , तरीही झाडीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल गावात बदली झाल्याने जावे की नाही हा संभ्रम निर्माण झाला होता.

आज आयुष्यात नोकरीची इतकी वर्षे ठाणे पालघर शहापूर भागात घालवल्यानंतर आता शेवटचे तीन चार वर्षे शिल्लक असताना एवढ्या दूर झाडीच्या जिल्ह्यात बढतीसह बदली झाल्याने एक नामी संधी मिळाली आहे, ती संधी सोडू नये ही कौटुंबिक इच्छा मान्य करीतआदिवासी गरीब बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या स्वप्नांच्या पुर्ततेसाठी, घरकुलाचे प्रश्न व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी इतर सहकाऱ्यांचे सहकार्याने प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या आयुष्यातील सुखद अनुभव कथन करताना ते म्हणतात , आयुष्यात कधी वर्ग १ चार अधिकारी होईन असे कधी वाटले नव्हते ते प्रत्यक्षात घडले आहे , ह्यापेक्षा सुखद अनुभव दूसरा असूच शकत नाही. त्याचवेळी २००८मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने १०दिवस बाॅंम्बे हाॅस्पिटलमध्ये भरती राहावे लागले तो काळ माझ्यासाठी आणि कुटुंबातील सगळ्यांसाठी अतिशय वेदनादायक काळ होता असे दोन वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तरात स्पष्ट केले. तर आयुष्यात कधी तणाव (स्ट्रेस ) येऊ द्यायचा नाही ,सगळ्यांशी गोडीगुलाबीने वागायचे असे ठरविले असून त्यावर अंमल सुरू आहे त्यामुळे कुणाला नाहक त्रास होऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे व न्यायासाठी लढा लढण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुष्यात ही संधी मिळाली नसती तर काय केले असते ?या प्रश्नाचे उत्तर देताना बि.एच. राठोड म्हणतात ,मी शिक्षक झालो असतो व विद्यार्जनाचे कार्य केले असते ,कारण शिक्षणाचा त्यापेक्षा दूसरा कुठला पर्याय त्याकाळी नव्हताच. नवतरुणांना संदेश:शेवटी आपली प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत करीत सातत्याने पाठपुरावा केला तर यशाची दारे उघडता येतात हाच संदेश यानिमित्ताने दिला.

मूल पं समिती परिसर , येथिल परिस्थिती आणि लोक शांतताप्रिय असल्याने इथे काम करताना आनंद होतोय आणि म्हणूनच त्या गरीबांच्या हक्कासाठी परिपूर्ण सहकार्य करण्याचा माझा मानस असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आदिवासी,गरजू गरीबांसाठी माझ्या कार्यालयाची दारे सदैव मोकळी असणार आहेत ,त्यांनी आपल्या अडचणी बिनदिक्कतपणे माझ्याशी संपर्क करुन सोडवाव्यात , आपणही काही सुचना अडचणी असतील ,कुठे काही चुकत असेल तर माझ्याशी केंव्हाही संपर्क साधून त्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि सोडविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.