शेतकऱ्यांनी अद्याप ‘ई-केवायसी’ न केल्याने त्यांची पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन धोक्यात आली आहे. सप्टेंबर अखेर मुदत असून, या कालावधीत ‘ई-केवायसी’ व आधार लिंक केले नाही, तर पेन्शन कायमची बंद करण्याचा इशारा सरकारने दिल्याने कृषी विभागाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
KYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. OTP Based eKYC is available on PMKISAN Portal
or nearest CSC centres may be contacted for Biometric based eKYC.
केंद्र सरकारकडून ज्याच्या नावावर सात/बारा आहे, त्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यांत मिळतात. यामधून आयकर भरणारे, सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. लाभार्थी हयात आहे की नाही, यासह त्याची इतर माहिती व्हावी, यासाठी केंद्र सरकारने मार्च २०२३ मध्ये ‘ई-केवायसी’ व ‘आधार लिंक’ करण्याचे आदेश दिले होते. गेले सहा महिने सरकारने सातत्याने मुदतवाढ दिली आहे; पण, आता ३० सप्टेंबर २०२३ ही शेवटची मुदत असल्याने या कालावधीत पूर्तता न करणाऱ्या शेतकऱ्यांची पेन्शन कायमची बंद होणार आहे.
अखेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना लॉगिंग मिळाले
पीएम किसान योजनेचे काम नेमके कोणी करायचे? याबाबत कृषी व महसूल विभागात वाद सुरू होता. कृषी विभागाने काम करण्याचा निर्णय झाला; पण, त्यांना लॉगिंगच दिले नव्हते. अखेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना लॉगिंग मिळाल्याने आता या कामाला गती येणार आहे.पीएम किसान योजनेचे लॉगिंग कृषी विभागाला मिळाले असून, स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने ई-केवायसीची पूर्तता करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी कृषी सहायकांना सहकार्य करून आपली केवायसी पूर्तता करून घ्यावी.