मूल तालुक्यातील नवेगाव भूजला येथील@शेतकऱ्याचा मुलगा झाला एमबीबीएस

88

मूल:- आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा आड येते. मात्र जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असला की कठीण परिस्थितीवरही मात करता येते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही मूल तालुक्यातील नवेगाव भूजला येथील एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा अक्षय रुखमानंद माहोरकर याने एमबीबीएसची डिग्री घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
डॉ. अक्षयचे बालपण मूल तालुक्यातील नवेगाव भूजला येथे गेले. त्यांनी इयत्ता सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून पूर्ण केले. आई शिलाबाई माहोरकर आणि बाबा रुखमानंद माहोरकर आणि पाच भावंडे असा मोठा परिवार. त्यात अक्षय हा सर्वात लहान उपजीविकेचे साधन केवळ शेती असल्याने त्यांची परिस्थीती अत्यंत हलाकीची. सगळ्या मुलांचे शिक्षण म्हंटले की, खर्च वाढेलच अशा परिस्थितीतही घरचे खचले नाही आणि मुलांच्या शिक्षणासाठी वाटेल ते हाल सोसण्याची तयारी केली.
अशातच मोठा भाऊ आशिष माहोरकर यांनी गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला व तिथेच राहून आपला लहान भाऊ अक्षय याला सुद्धा
बोलावून घेतले. यावेळी अक्षयने मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे राहण्यासाठी सोय करून जुबिली हायस्कूल चंद्रपूर येथे प्रवेश घेतला.
पहिल्याच वर्षी वर्गातून पहिला क्रमांक पटकाविला आणि अक्षयचा खरा प्रवास सुरू झाला. त्यानंतर अकरावी, बारावी सायन्ससाठी भवानजीभाई चव्हाण, ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि डॉक्टर व्हायचा चंग बांधला. नंतर मेडिकल प्रवेश परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. नंतर तब्बल साडेपाच वर्ष अभ्यास करून आज अक्षयचा डॉ. अक्षय झाला असून सध्या तो जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे कार्यरत आहे.