कला, कृषी, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण ,एलएलबी,परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

42

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच कला, कृषी, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण या विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात घेणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार १८ मार्च ते २३ जुलै या कालावधीत विविध टप्प्यांवर ‘सीईटी’ परीक्षा होणार आहेत. त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी होणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षा ९ ते २० मे दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध अभ्यासक्रमांच्या जवळपास २० हुन अधिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या विविध सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक रविवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या जेईई, नीट, सीयुईटी, यूजीसी नेट, अशा विविध परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. या सर्व परीक्षांसह महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन सीईटी सेलने राज्यात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले.त्यानुसार अभियांत्रिकी (बी.ई आणि बी. टेक), कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा ९ ते १३ मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी १५ ते २० मे दरम्यान परीक्षा होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबी (५ वर्ष) यासाठी १ एप्रिलला, तर एलएलबी (३ वर्ष) यासाठी २ आणि ३ मे रोजी परीक्षा होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.