संजय गांधी,श्रावण बाळ निराधार योजनांच्या नव्या समित्या कागदावरच, मुहूर्ताची प्रतीक्षाच

95

बरखास्त केलेल्या निराधार योजनांच्या नव्या समित्या अद्याप कागदावरच आहेत. एकीकडे नव्या समितीत नियुक्ती व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे या योजनेच्या लाभासाठी प्रयत्न करणाऱ्या निराधारांची फरफट सुरू आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य कृती निवृत्तीवेतन योजना या दोन राज्यस्तरावरील योजनांद्वारे, तर इंदिरा गांधी वृद्धापकाळ विधवा आणि दिव्यांग योजनांद्वारे निराधारांना दरमहा एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

लाभार्थीचे अर्ज स्वीकारून ते मंजूर करण्यासाठी तालुकानिहाय समित्या असतात. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नव्या सरकारने जुन्या सरकारच्या कालावधीतील या सर्व समित्या बरखास्त केल्या. यानंतर मात्र आता पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही नव्या समित्यांची रचना झालेली नाही.

पूर्वीच्या समित्या बरखास्त केल्यानंतर सध्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्यांचे कामकाज सुरू आहे. मात्र, तहसीलदारांकडे असणारा अन्य कामांच्या व्यापाचा विचार करता सध्याच्या समित्यांचे गठण होणे गरजेचे आहे.

अशा आहेत विविध योजना ■ संजय गांधी निराधार योजना ■ एससी श्रावण बाळ निवृत्तीवेतन ■ श्रावण बाळ निवृत्तीवेतन एससी केंद्र योजना ■ इंदिरा गांधी वृद्धापकाळ ■ इंदिरा गांधी विधवा योजना ■ इंदिरा गांधी दिव्यांग योजना

लाभार्थ्यांना लवकरच थेट बँक खात्यात अनुदान

योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच थेट बँक खात्यात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. एका योजनेद्वारे येत्या काही दिवसांत त्याचा प्रारंभ केला जाणार आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.