एसटी कंडक्टर कडून शालेय विद्यार्थीनीस मारहाण, कारवाई करण्यांची श्रमिक एल्गारची मागणी

84

मूल (प्रतिनिधी)

‘एसटी काय तुमच्या बापाची आहे काय?’ असे म्हणत महिला एसटी कंडक्टरनी शालेय विद्यार्थीनीस मारहाण केल्याची तक्रार या विद्यार्थीनीने केली आहे. या प्रकरणी संबधीत कंडक्टवर कारवाई करावी अशी मागणी श्रमिक एल्गारने गडचिरोली बस डेपोचे व्यवस्थापक यांचेकडे केली असून, कारवाई न केल्यास आंदालनाचा इशारा दिला आहे.
दिनांक 28/12/2022 रोजी नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थींनी शाळेची सुट्टी झाल्यानंतर, आपल्या गावी परत जात असतांना, दुपारी 3.30 वाजताचे दरम्यान गडचिरोली चंद्रपूर ही आर्डनरी बस क्रमांक एमएच 40 एन 9331 मध्ये बसत असतांना, या बसमधील कंडक्टरने या मुलींना बस मध्ये बसण्यांस मज्जाव केला. या मुलींचे पासेस फेकून दिले. एवढेच नाही तर बसमध्ये शिरलेल्या आरती ताजने या मुलींच्या गालावर मारून, तीला खाली ढकलून दिले. बस तुमच्या बापाची आहे काय? असे म्हणत वाईट शिवीगाळ केली. याबाबत या विद्यार्थींनीने तक्रार केली असून, आज मूल बस स्थानकांवर माहिती घेतली असता, सदर कंडक्टर ही वाडेकरम असल्यांची माहिती मिळाली.

ही कंडक्टर यापूर्वीही शालेय विद्यार्थींनीना बस मध्ये घेण्यास मज्जाव करीत असते अशी तक्रार या विद्यार्थींनीने केली आहे. बसमध्ये जागा राहीली तरीही विद्यार्थींना तुम्ही मानव विकास मिशनच्या बसेसने या म्हणत इतर प्रवाशाना घेवून बस सोडत असल्यांची गंभीर तक्रार या विद्यार्थानी केली असून, यामुळे या विद्यार्थ्याच्या शालेय जीवनावर नकारात्मक परिणाम पडत असल्यांचा आरोप श्रमिक एल्गारने केला आहे.

वास्तवीक मुली अधिक शिकल्या पाहीजे याकरीता शासनाने अहिल्याबाई होळकरचे नावांने मोफत बस पासेसची योजना आणलेली असतांना व या योजनेतून एसटी महामंडळाला करोडो रूपये शासनाकडून मिळत असतांनाही, या विद्यार्थीनीसोबत एसटी कर्मचार्यांनी मारहाण करणे, अपमानास्पद वागणूक देणे, ही अतिशय गंभीर बाब असून, परिवहन विभागाने तातडीने संबधित कंडक्टरवर कारवाई करावी अन्यथा श्रमिक एल्गार मूल बस स्थानकासमोर आंदोलन करेल असा इशारा श्रमिक एल्गारचे केंद्रिय संघटक विजय सिध्दावार यांनी दिला आहे