ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 मतदान व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू

65
Ø 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी
चंद्रपूर,दि. 17: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मूल, जिवती, कोरपना, राजुरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, सावली व पोभूंर्णा या तालुक्यातंर्गत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तर जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या मुख्यालयी दि. 20 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. 18 डिसेंबर रोजी उपरोक्त मतदान केंद्राच्या ठिकाणी सकाळी 6 ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्र व लगतच्या 100 मीटर परिसरात तर दि.20 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी संपेपर्यंत उपरोक्त तालुक्यातील मतमोजणी केंद्र व लगतच्या 100 मीटर परीसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी सी यांनी निर्गमित केले आहे.
दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मूल, जिवती, कोरपना, राजुरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, सावली व पोंभूर्णा तालुक्यातील संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात तर दि.20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत तालुक्यातील मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समूहात जमा होणार नाही.
मतदान केंद्राच्या व मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसर व क्षेत्रांतर्गत उक्त दिनांकास सकाळी 6 ते मतदान व मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मतदानाशी तसेच मतमोजणीशी संबंधित प्रत्यक्ष हालचाली व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील.
तसेच मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रालगतच्या परीसरात मोबाईल, सेल्युलर फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट आदी. स्वयंचलित दुचाकी वाहन, व्हिडिओ चित्रीकरण, फोटोग्राफी, शस्त्रे इत्यादीस प्रतिबंध राहील. सदर आदेश दि. 18 डिसेंबर, रोजी उपरोक्त मतदान केंद्रावर तर दि.20 डिसेंबर, 2022 रोजी उपरोक्त मतमोजणी केंद्रावर सकाळी 6 ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम समूह प्रचलित कायदेशीर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.