जालौर राजस्थान येथील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या नराधम शिक्षकाला फाशी देण्यासंदर्भात मूलमध्ये निघाला भव्य मोर्चा

29

मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंबेडकरी समाजाने घटनेचा निषेध नोंदविला व निवेदन दिले

मुल:- एकीकडे संपूर्ण देश आजादीचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत होता तर दुसरीकडे जातीयता, धर्मांधतेने ग्रासलेल्या व्यवस्थेमुळे एका निष्पाप कोवळ्या विद्यार्थ्यांचा एका नराधम शिक्षकाने बळी घेतला. या नराधम शिक्षकाला भररस्त्यात फाशी देऊन संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मोर्चाद्वारे आंबेडकरी जनतेने प्रशासनाला निवेदन देऊन केली.
भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण होऊनही अजूनही जातिव्यवस्थेची कीड मनुवादी विचारसरणीच्या लोकांच्या मनातून गेलेली नाही हे राजस्थानच्या जालौर येथील घटनेवरून दिसून येते. पिण्याच्या माठातून पाणी पिण्याच्या कारणावरून एका दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम व अमानुष मारहाण केली त्यामुळे त्या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून याला जबाबदार सध्याची राजकीय व्यवस्था, जातीयवादी मानसिकता व तेथील संबंधित प्रशासन आहे. संबंधित शिक्षण संस्थेत दलितांना पिण्याचे पाणी वेगळे व सवर्णांना पिण्याचे पाणी वेगळे अशी व्यवस्था करून ठेवली होती. तरीसुद्धा तेथील अधिकारी, जिल्हाधिकारी, संबंधित शिक्षण संस्थेचे पदाधिकारी हे सुद्धा तितकेच दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या देशात एससी, एसटी, ओबीसी वर होणारे अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत असून याला जबाबदार तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार आहे. या देशात मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी जातीय व्यवस्था बळकट करण्यासाठी व या व्यवस्थेतून सत्तेची मलाई खाण्याचे काम करत आहे.याच धोरणामुळेच या देशाचा सत्यानाश होत असून देशात कुठे ना कुठे असे प्रकरण घडून दलित, आदिवासीं, ओबीसीवरचे अत्याचार वाढत आहेत.अत्याचार करणाऱ्याला वेळीच आवर घालण्यासाठी त्या नराधम शिक्षकाला भर रस्त्यात फाशी द्यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरी जनतेने मोर्चाच्या माध्यमातून केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. मोठ्या संख्येने आंबेडकरी समाजाने घोषणाबाजी करत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा निघाला व तहसीलदार यांना निवेदन दिले. सदर मोर्चाचे नेतृत्व प्रशांत उराडे, सुजित खोब्रागडे, सुरेश फुलझेले, अतुल गोवर्धन, आकाश दहिवले, हिरालाल भडके, गौरव शामकुळे, प्रज्योत रामटेके, अश्विन पालीकर, काजू खोब्रागडे, डेव्हिड खोब्रागडे, श्याम उराडे, पुरुषोत्तम साखरे, बालू दुधे, कुमार दुधे, रुपेश निमसरकार, लीनाताई फुलझेले, सपना निमगडे, उषा दुर्गे साक्षी रामटेके,पूजाताई डोहणे, बबलीताई भडके, अनिकेत वाकडे, अजय रंगारी, कैलास घडसे, कालिदास खोब्रागडे, अर्चना कुंभारे, राजू घोनमोडे ,राजेश खोब्रागडे, ज्ञानी मेश्राम तथा मूल शहरातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज उपस्थित होता.