एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प,स्मार्ट कार्ड वितरण मात्र सुरू,३१ ऑगस्टपर्यंत मुदत

32

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच इतर सवलतपात्र प्रवाशांना स्मार्ट कार्ड बाळगणे येत्या ३१ ऑगस्टपासून बंधनकारक होणार असल्याच्या पृष्ठभूमीवर स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांची लगबग सुरु झाली असतानाच गत तीन आठवड्यांपासून नोंदणी प्रक्रिया बंद झाली आहे.सर्व्हर ठप्प झाल्याने स्मार्ट कार्ड नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे चित्र  दिसून येत आहे.

गत दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरोना संसर्गाची स्थिती व एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पुकारलेला संप या दोन कारणांमुळे आगार व विभागीय कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे आतापर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु हजारो सवलतधारकांनी नव्या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच नोंदणी केलेल्या अनेकांना स्मार्ट कार्ड वितरित झालेले नाहीत. परिणामी, सवलतधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुदतवाढ मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच गत १५ ते २० दिवसांपासून स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया बंद पडली आहे. तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी बंद असल्याचा फलकच मध्यवर्ती बसस्थानकावरील कक्षाच्या खिडकीवर लावण्यात आला आहे.  नोंदणी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना  नाहक येरझारा घालाव्या लागत असल्याचे चित्र आहे.

स्मार्ट कार्ड वितरण मात्र सुरू

यापूर्वी नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतपात्र प्रवाशांचे स्मार्ट कार्ड त्या त्या आगारांमध्ये प्राप्त झाले आहेत. हे स्मार्ट कार्ड वितरित करण्याची प्रक्रिया मात्र सुरू आहे. ज्यांनी आधी नोंदणी केलेली आहे, त्यांनी स्मार्ट कार्ड घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

३१ ऑगस्टपर्यंत मुदत

स्मार्टकार्ड नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रचलित ओळखपत्रांवर प्रवास करण्याची मुभा आहे. त्यानंतर मात्र स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. नोंदणी प्रक्रिया ठप्प असल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड अभावी या सवलतीचा लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. तथापि, तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया अव्याहतपणे सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.