विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे – सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे

31
चंद्रपूर, दि. 20 जुलै : बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत, श्रीमती वाघमारे उपस्थित होते.
सद्यस्थितीत बाजारपेठेमध्ये आवश्यक असलेल्या कौशल्याचा अभ्यास करून त्यानुसार अभ्यासक्रमाची निवड करावी व कौशल्य प्राप्त करून रोजगार व स्वयंरोजगार करावा, असे सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून विविध योजना, उपक्रमाचे प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सामान्य रुग्णालयाचे अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांचा सत्कार करण्यात आला. “कौशल्य विकासाचे जीवनामध्ये महत्त्व” या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी उमेदवारांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त करून दिल्याबद्दल संजीवनी आर्थोपेडिक हॉस्पिटलला सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच आदिवासी उमेदवारांकरिता स्पर्धा पूर्व परीक्षा प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
सदर कार्यक्रमास ग्रंथालय, आदिवासी मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी, तसेच सितारामन हॉस्पिटलचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय चंद्रपट्टण तर आभार मुकेश मुंजनकर यांनी मानले.