मूल तालुक्यातील मोरवाही येथे नि:शुल्क आरोग्य रोगनिदान शिबिर

45

ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी व त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ह्याआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दीपक देशपांडे
मूल, प्रतिनिधी.
ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी व त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ह्याआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन दीपक देशपांडे जिल्हा संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी केले.
मूल तालुका ग्राहक पंचायत, मातोश्री क्लिनिक व प्रणय मेडिकलच्या सौजन्याने मूल तालुक्यातील मोरवाही येथे आज रविवार दिनांक २६/०६/२०२२ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मोरवाही गावच्या प्रथम नागरिक अनुराधा नेवारे सरपंच अध्यक्षस्थानी होत्या, तर दीपक देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, आणि वर्षा आरेकार, उपसरपंच, ज्योती मेश्राम, तंटामुक्त समिती अध्यक्षा,व पुरुषोत्तम रायपूरे , प्रगतीशील शेतकरी आदि अतिथी म्हणून उपस्थित होते.
मोरवाही येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुरेखा झरकर यांच्या नवीन घरी या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात होते.
ऐन पावसाळ्याच्या दिवसात शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्यात व्यस्त असतांनाच या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेऊ शकतील की नाही अशी शंका असतांनाच ग्रामस्थांनी या तपासणी शिबिराचा भरभरून लाभ घेत चांगला प्रतिसाद दिला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी असलेल्या सरपंच अनुराधा नेवारे यांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले व या गावात वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने इतरत्र जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली व या आयोजनासाठी आयोजकांना धन्यवाद दिले, आणि ग्राहक हित जोपासण्यासाठी ग्राहक पंचायत संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याची प्रशंसा करीत ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहनही केले.एवढेच नाही तर ग्रामसभांना उपस्थित राहून आपल्या मागण्या व समस्या पुढे ठेवत त्या कशा सोडविता येतील यासाठी चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा केले.
याप्रसंगी दीपक देशपांडे यांनी ग्राहक म्हणून सर्वसामान्य माणसाला मिळालेले अधिकार, ग्राहक संरक्षण कायदा,आणि त्यांच्या अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणी विशद केल्या व आज आपण जागरूक होणे किती गरजेचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाला मोरवाहीचे माजी सरपंच सुरेश झरकर , ग्राहक पंचायत मूलचे तुळशीराम बांगरे,बंडूजी धमदेरे ,मनोज झरकर , किशोर झरकर, आनंदराव चचाणे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नियोजित वेळ संपली तरीही ग्रामस्थ या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येतच होते.हे वृत्त लिहिस्तोवरही रुग्णांचा ओघ सुरुच होता.
एक यशस्वी आयोजन अशी गावकऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.
कार्यक्रमात सत्कारमूर्ती व शिबिराचे महत्वाचे व्यक्ती म्हणून मातोश्री क्लिनिक चे संचालक डॉ अमेय झरकर व प्रणय मेडिकलचे प्रणय बांगरे जातीने उपस्थित राहून रुग्णांना तपासणी व औषधोपचार,व औषधी चे वाटप करीत होते.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.