भादुर्णी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पडझरी येथील वाघाच्या हल्ल्यात युवकाचा बळी

51

मूल:- 
शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकरी युवकावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान तालुक्यातील पडझरी येथे घडली. प्रमोद झुंगाजी मोहुर्ले (वय ३२) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
तालुक्यातील भादुर्णी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पडझरी येथील युवा शेतकरी प्रमोद मोहुर्ले नेहमीप्रमाणे शुक्रवारला सकाळी ७ वाजतानंतर गुरे चारण्यासाठी कक्ष क्रमांक ३२४ लगतच्या शेतात गेला. गुरे चारत असताना सकाळी ११ वा. सुमारास शेतालगतच्या जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने प्रमोदवर अचानक हल्ला करून जंगलात ओढत नेले.


ग्रामस्थांनी जंगलाकडे धाव घेत शोध घेतला. तेव्हा प्रमोद मोहुर्ले मृतावस्थेत दिसून आला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलिस अधिकारी सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचून प्रमोदचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. घटनास्थळ हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येत असून या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. परिसरात यापूर्वी चार व्यक्तीं आणि १0 ते १२ जनावरांना वाघाचा हल्यात जीव गमवावा लागला आहे. आता वन्यप्राणीच जंगल सोडून गांवालगतच्या शेतात येऊन मनुष्यावर हल्ले करून ठार करीत असल्याने शेतकर्‍यांनी शेतीची मशागत करायची कशी ? असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभाग आणि पोलिस अधिकार्‍यांनी ग्रामस्थांसमक्ष घटनास्थळ व प्रेताचा पंचनामा व मोकाचौकशी न करता मृतकाचे पार्थिव शवविच्छेदनाकरिता घेऊन गेले. अधिकार्‍यांची ही कृती बेकायदेशीर असून सरपंच व ग्रामस्थांनीसंबंधित अधिकार्‍यांविरुद्ध पोलिस स्टेशन मूल येथे तक्रार नोंदविली आहे

*घटनेची माहीती होताच मी सहका-यांसह घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा ग्रामस्थ वनविभागाविरूध्द रोष व्यक्त करीत होते. यापुर्वी घडलेल्या वाघाच्या हल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियास वनविभागाने २५ हजाराचे वर आर्थिक मदत दिलेली नाही. असा त्यांचा आरोप होता. मदत न देण्याची बाब चुकीची असुन जनतेच्या भावनांशी खेळणारी आहे. त्यामुळे वनविभागाने वाघाच्या हल्यात मृत्यु पावलेल्या ज्या कुटूंबाना आर्थिक मदत दिली नाही, त्यांना तात्काळ आर्थिक मदत दिल्या जावी व निराधार झालेल्या कुटूंबातील वारसदारास वनविभागाने रोजगार उपलब्ध करून द्यावा. जंगलालगतच्या ग्रामस्थांना वन्यप्राण्यांपासुन संरक्षण दिल्या जावे. अश्या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंञी आणि जिल्ह्याचे पालकमंञी यांना पाठविले आहे.
संतोषसिंह रावत
अध्यक्ष, जि.म.सह.बँक चंद्रपूर