मूल येथील दोन दुकानांना आग,१५ ते २0 लाखांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज

69

मूल :-  येथील सोमनाथ मार्गावरील त्रिमूर्ती प्रॉपर्टी डिलर्सच्या मालकीच्या इमारतीमध्ये विलेन विला कापड दुकानासह लागून असलेल्या लक्ष्मी ब्युटी कलेक्शनला अचानक आग लागल्याने दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने दोन्ही विक्रेत्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. सदर आगीची घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे.
नेहमीप्रमाणे विलेन विलाचे मालक मयूर शेख आणि लक्ष्मी ब्युटी कलेक्शनचे मालक विश्‍वजित उडान हे दोघेही रात्री ९ वाजता नंतर दुकान बंद करून घरी परतले. दरम्यान, रात्री १ वाजताच्या दरम्यान गस्तीवर निघालेल्या पोलिसांना सदर दुकानाच्या शटरमधून धूर निघत असल्याचे दिसले. सदर माहिती ठाणेदार सतीशसिंह राजपूत आणि नगर प्रशासनास तत्काळ दिली. पोलिस कर्मचार्‍यांकडून माहिती मिळताच पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी ठाणेदाराशिवाय पोलिस कुमक आणि नगर परिषदेचे अग्निशमन पथक पोहोचले. दोन्ही दुकान मालकांशी संपर्क साधून बोलावून घेत दुकान उघडले असता दोन्ही दुकानातील साहित्याला मोठय़ा प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले.
तातडीने सावली, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील अग्निशमन पथकाला पाचारण करण्यांत आले. तिन्ही ठिकाणचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होईपयर्ंत मूल येथील अग्निशमन पथकाने फोफावलेली आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु दुकानातील कापड आणि सौंदर्य प्रसाधने साहित्यासह प्लास्टिक वस्तूंमुळे आग विझविण्यात अनेक अडचणी आल्या. तिन्ही ठिकाणचे अग्निशमन पथक पोहोचे पयर्ंत दोन्ही दुकानातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी मूल येथील अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी अथक पर्शिम घेतले. आग लागण्याचे कारण समजू शकले नसले तरी शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. दुकानाला लागलेल्या आगीत दोन्ही विक्रेत्यांचे प्रत्येकी १५ ते २0 लाखांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.