५३ व्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीचा समारोप,नवभारताच्या निर्मितीचा ध्यास घेत सोमनाथ प्रकल्पात

46

मूल : सेवा, श्रम, त्याग, कर्तव्य, जबाबदारी आणि देशाभिमानाचे धडे देणाऱ्या ५३ व्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीचा समारोप नवभारताच्या निर्मितीचा ध्यास घेत सोमनाथ प्रकल्पात रविवारी पार पडला. बलशाली भारत आणि सशक्त युवक हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या वतीने १९६८ पासून श्रम संस्कार छावणीचा श्रीगणेशा केला. कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी १५ ते २२ मेच्या रखरखत्या उन्हात तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पात ५३ वी श्रमसंस्कार छावणी आयोजित करण्यात आली होती. राज्यातील विविध जिल्ह्यासह चार राज्यातील १५ ते ७९ या वयोगटातील जवळपास ३५० चेवर युवक युवती छावणीत सहभागी झाले होते.

सूर्योदयाच्या वेळेस ध्वजारोहणाने प्रारंभ झालेल्या सातदिवसीय आंतरभारती श्रमसंस्कार छावणीचा समारोप २२ मेच्या सूर्योदयी वृक्षदिडीं आणि पंचमहाभुतांना आवाहन करीत करण्यात आला. महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या छावणीच्या समारोपीय कार्यक्रमास बाबा आमटे यांनी काढलेल्या भारत जोडो अभियानातील सहयात्री डॉ. सोमनाथ रोडे, जेकब, डॉ. भारती आमटे, कौस्तुभ आमटे, मंदार भारदे, जगदिश पुराणीक, अरुण कदम आणि शिबिर प्रमुख पल्लवी आमटे आदी उपस्थित होते. सोमनाथ प्रकल्पाच्या सभोवताल ग्रीन वॉल उभारण्याशिवाय आरोग्यासाठी पर्यावरण आणि पर्यावरणासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सहभागी

शिबिरार्थ्यांनी नर्सरी तयार करणे, खड्डे खोदून वृक्ष लागवड करणे आणि मोठ्या वृक्षांच्या संवर्धनासाठी उपाय आदी काम केली. छावणी दरम्यानच्या प्रबोधन काळात डॉ. विकास आमटे यांनी आनंदवन-प्रयोगवन व संस्थेचा प्रवास या विषयावर, केतकी घाटे यांनी निसर्ग आणि मानवाची जबाबदारी, अमिता देशपांडे यांनी कचरा समस्या आणि रोजगार निर्मिती, ग्राम स्वाभिमान संस्थेचे मॅगसेसे विजेते अंशू गुप्ता यांनी सामाजिक समस्या व आपली जबाबदारी, वाईल्ड लाइफ फाउंडेशनचे आनंद शिंदे यांनी हत्तींशी संवाद, यशस्वी उद्योजक मंदार भारदे यांनी उद्योग आणि स्वप्न, व्यक्तिमत्व अभ्यासक संजय साळुंखे यांनी व्यक्तिमत्व विकास, अनिकेत आमटे यांनी बाबा आमटे यांच्या स्वप्नातील भारत, डॉ. सोमनाथ रोडे यांनी भारत जोडो अभियानावर मार्गदर्शन  करताना सशक्त व सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी युवापिढीचे योगदान, अनिकेत आमटे यांनी युवापिढीचे सामूहिक योगदान याविषयावार मार्गदर्शन केले. छावणी काळात कौस्तुभ आमटे व पल्लवी आमटे यांनीही वेगवेगळ्या अनुभवाची माहिती देत प्रयोगशील होण्याचे आवाहन केले. छावणीत सहभागी युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध खेळ व बौध्दिक स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीचा सात दिवस आनंद घेतला. बाबा आमटे यांनी निर्माण केलेल्या छावणीच्या समारोपीय कार्यक्रमानंतर स्वगावाकडे परत जाताना मात्र प्रत्येक शिबिरार्थी बाबांच्या विचाराने प्रेरीत होऊन नवभारताच्या निर्मितीस हातभार लावण्याचा संकल्प व ग्वाही देत जड अंतःकरणाने छावणीतून बाहेर निघत होता. छावणीच्या यशस्वीतेसाठी छावणी समन्वयक रवींद्र नलगंटीवार, अरुण कदम, विजय जुमडे यांच्यासह प्रकल्पातील अनेक लहान मोठ्यांनी सहकार्य केले.