दोन लाख रकमेपर्यंत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा

41

 शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर परिस्थिती, सर्पदंश, विजेचा शाक बसणे, आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही अपघाती कारणामुळे शेतकरी तसेच शेतकरी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित शेतकऱ्याचा वारसदारांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत शासनाच्या कृषी विभागामार्फत मदत केली जाते. यासाठी सातबाराधारक शेतकरी तसेच कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती पात्र आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपये रकमेपर्यंत विमा मदत मिळते. अपघात होणाऱ्या शेतकऱ्याचा विमा प्रस्ताव 90 दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे कृषी विभागामार्फत सादर करता येईल. विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी 18 ते 75 या वयोगटातील सातबाराधारक असावा किंवा कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे शेत जमीन असणे अत्यावश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.

कोणाला मिळणार नाही योजनेचा लाभ :-

विमा कालावधीपूर्वीची अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना अपघात, अंमली पदार्थांमुळे अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, मोटार शर्यतीत अपघात आदी बाबींचा विमासंरक्षण समावेश नाही किंवा यामुळे विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.

विम्यासाठी लागणारी कागदपत्रे :-

सातबारा गाव नमुना क्रमांक 6 ड, घटनास्थळाचा पोलिस पंचनामा, वयाचा • दाखला, पॅन कार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला यापैकी एक. पोलिसांचा एफ आय आर अथवा फेरफार नोंदीबाबतचे प्रमाणपत्र, गाव नमुना क्रमांक सहा अथवा वारस प्रमाणपत्र तसेच प्रतिज्ञापत्र सर्व कागदपत्रे साक्षांकित केलेले असावीत. शेतकऱ्यांचा जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.