विद्यार्थ्यांनो विविध दाखले काढून ठेवा. मुल शहरात 11 सेवा केंद्र व तालुक्यात 60 आपले सरकार केंन्द्र

40

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल पुढच्या महिन्यात जाहीर होणार आहे. निकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होते.

याच काळात विविध दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने प्रशासनालाही वेळेत दाखले देण्यास मर्यादा येतात. यापार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी निकालापूर्वीच आतापासून शैक्षणिक प्रवेशासाठीचे दाखले काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी व बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विविध दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी सेतू केंद्रात होते. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने अर्जांची छाननी आणि त्यानंतर प्रत्यक्ष दाखले देण्यास वेळ लागतो. विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी  आतापासून तयारी सुरू केली आहे.

उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला आदी दाखले ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. सेतू केंद्रात न जाता विद्यार्थ्यांना घराजवळील महा-ई-सेवा केंद्रात दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थांनी महा-ई-सेवा केंद्रात जाऊन अथवा आपले सरकार या पोर्टलवरून दाखल्यांसाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दाखला आणि तो मिळवण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे
उत्पन्नाचा दाखला : अर्ज, स्वघोषणापत्र, दोन फोटो, आधारकार्ड अथवा पॅनकार्ड, वीजबिल, करपावती, रेशनकार्ड यापैकी एक, नोकरदार असल्यास फॉर्म 16, व्यावसासिक असल्यास आयकर विवरणपत्र, शेतकरी, मजूर असल्यास तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला.
वय-राष्ट्रीयत्व अधिवास दाखला : स्वघोषणापत्र, फोटो, आधारकार्ड अथवा पॅनकार्ड, विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किवा जन्म दाखला, दहा वर्षांचे रहिवास पुराव्यासाठी विजेचे बिल अथवा महापालिकेची करपावती, तलाठी यांचा रहिवासी दाखला.

नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र : स्वघोषणापत्र, फोटो, लाभार्थीचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तीन वर्षांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, आधारकार्ड

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासांठी प्रमाणपत्र : स्वघोषणापत्र, फोटो, आधार अथवा पॅनकार्ड, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 1967 पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विजेचे बिल, करपावती.

ई-सेवा केंद्रांतही सुविधा
विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. घराजवळील महा-ई सेवा केंद्रामध्ये दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर महा-ई सेवा केंद्रातूनच दाखले देण्यात येणार आहे.  शहरात सुमारे
11 महा-ई सेवा केंद्र असून  तालुक्‍यात 60 पेक्षा अधिक महा ई सेवा केंद्र आहेत.

“आपले सरकार’ संकेतस्थळही फायद्याचे
आपले सरकार या संकेतस्थळावरूनही डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले ऑनलाइन मिळणार आहे. यासाठी अर्जदाराने आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन आवश्‍यक ती माहिती भरल्यानंतर तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज ऑनलाइन स्वीकारला जाणार आहे. त्यानंतर अर्जदाराला ई-मेलद्वारे तसेच या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले मिळणार आहे.