लाखो रूपये खर्चाचे पाण्याचे फवारे पाण्याविना झाले कोरडे पाण्याच्या फवा-यासाठी काँग्रेस आक्रमक

34

मूल : स्वच्छ आणि सुंदर शहर अभियानात सहभागी होण्यासाठी नगर परीषदेच्या वतीने लाखो रूपये खर्चुन निर्माण करण्यात आलेले चौक व मोक्याच्या जागेवरील सौदर्यीकरणाचे देखावे दुर्लक्षित असुन पाण्याविना कोरडे पडल्याने शासनाचे लाखो रूपये पाण्यात जातात की काय ? अशी भिती नागरीकांना वाटु लागली आहे.

केंद्र व राज्य शासनाव्दारे घेण्यात आलेल्या स्वच्छ शहर-सुंदर शहर या अभियानात शहराचा समावेश व्हावा म्हणुन नगर परीषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांच्या सहकार्याने तत्कालीन मुख्याधिकारी विजय सरनाईक आणि सिध्दार्थ मेश्राम यांनी लाखो रूपये खर्चुन शहर सौंदर्यीकरणाच्या विविध योजना राबविल्या. या अंतर्गत शहरातील बहुतांश प्रभागातील चौक आणि रहदारीच्या मार्गावरील मोकळ्या ठिकाणी पाण्याचे (फाऊंटन) फवारे निर्माण करून त्याठिकाणी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि विविध प्राण्यांचे पुतळे निर्माण करून शहराचे सौंदर्यीकरण केले.

राञौच्या वेळेस फिरत असताना स्थानिक नागरीकांशिवाय पाहुणपणासाठी येणारे नागरीक व बालकांना या सौंदर्यीकरणाचे विशेष आकर्षण व कुतुहल वाटायचे. काही दिवस पर्यंत कुतुहल आणि आकर्षणाचे हे पाण्याचे फवारे नियमित सुरू राहत असतांना कधीकधी आठवड्यातुन दोन-तीनदा सुरू राहात होते. कालांतराने माञ त्याच पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या ह्यातीत हे पाण्याचे फवारे कायमचेच बंद झाले आहेत, मंञी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शहर भेटी दरम्यान विसाव्या करीता उभ्या असलेल्या येथील विश्राम गृहा समोरील मोकळ्या जागेत निर्माण केलेला पाण्याचा फवारा आणि प्राण्याचे पुतळे धुळखात आहे.

सभोवताल केलेले तारेचे कुंपण तुटले असल्याने कोणालाही सौंदर्यीकरणाचे ठिकाणी सहजरित्या जाता येते, त्यामुळे बालकांसह शरीराने व वयाने मोठी असलेली अनेक मंडळी सौदर्यीकरण स्थळी प्रवेश करून असलेल्या प्राण्यांवर बसुन तर कधी बंद असलेल्या फवा-यासमोर झोपुन फोटो काढण्याचा आनंद घेत आहेत. अशीच काहीशी शहरातील सर्वच ठिकाणच्या शहर सौंदर्यीकरण स्थळाची अवस्था झाली असुन कच-याने व्याप्त व धुळीने माखलेले पाण्याचे हे फवारे कित्येक दिवसांपासुन बंदावस्थेत आहे. त्याठिकाणी लावलेले रंगीबेरंगी लाईट आणि इतरही साहीत्यावर काहींनी संधी साधुन हात साफ केले आहे. त्यामुळे शहर सौंदर्यीकरणाच्या चांगल्या उद्देशाने लाखो रूपये खर्च करून निर्माण केलेले हे पाण्याचे फवारे निरर्थक ठरत असुन यासाठी खर्च झालेले लाखो रूपये फवा-यात स्वाहा होण्याची भिती स्थानिक नागरीकांना वाटु लागली आहे.

पाण्याच्या फवा-यासाठी काँग्रेस आक्रमक
बंद असलेले शहराच्या विविध ठिकाणी निर्माण करण्यात आलेले शहर सौंदर्यीकरणाचे हे फवारे तात्काळ सुरू करावे. अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. एका फवा-याकरीता अंदाजे २ लाख रुपये खर्च करून शहरात १७ ठिकाणी एकुणा ३४ लाख रूपये खर्च करण्यात आले. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे फवारे बांधकामाकरीता वापरण्यात आलेले ३४ लाख रूपये उपयोगाविना झाल्याचा आरोप केल्या जात आहे. शहराचा लौकीक वाढविण्याच्या नांवाखाली लाखो रूपये खर्च करुन जनतेच्या पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप माजी नगरसेवक विनोद कामडी यांचेसह काँग्रेसचे सुरेश फुलझेले, चंद्रकांत चटारे, आसिफ पठाण, आशिष रामटेके, संदीप मोहबे, अतुल गोवर्धन, गिरीधर गाजेवार, दिवाकर वाढई यांनी एका निवेदनाव्दारे केला असुन सदर कामाची चौकशी करावी. अन्यथा आंदोलन करू. असा इशारा प्रशासक महादेव खेडकर यांना भेटुन दिला आहे.