मूल तालुक्यातील चिखली येथील गोठ्याला आग लाखोंचे नुकसान

40

 मूल तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. येथील वीरेंद्र यशवंतराव कडस्कर यांच्या वाड्यातील गोठ्याला दुपारी अचानक आग लागली. सध्या वाड्यात कुणीही राहत नसून त्यांचा परिवार चंद्रपूर येथे राहतो. येथे वाड्याच्या देखभालीसाठी एक माणूस राहत असून तो आपल्या घरी जेवण करायला गेला होता. वाड्याच्या महिला पाण्यासाठी शेजारील विहिरीवर गेल्या असता त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी नागरिकांना आवाज देऊन बोलाविले व आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र, आग विझविण्यात यश मिळाले नाही.गावकऱ्यांनी प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.  आगीने रौद्ररूप धारण केल्याने, मुल येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि आग आटोक्यात आली. आग  बघणार्‍यांची गर्दी मोठी झाल्याने,यावेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.या आगीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाल्याने विरूजी कळस्कर यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.