Property Card Online: डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

72

प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक. महाराष्ट्र सरकारनं आता डिजिटल स्वाक्षरीतलं प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाहीये.

तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ते काढू शकता. ते कसं काढायचं, त्यासाठी किती फी आकारली जाणार आहे, याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?

ज्या पद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.

म्हणजे काय तर बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते.

तुमची मालमत्ता महानगरपालिका क्षेत्रात असेल तर डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला 135 रुपये, अ,ब, क नगरपालिका-नगरपंचायतींसाठी 90 रुपये, तर ग्रामीण क्षेत्रासाठी 45 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं?

मिळकत पत्रिका काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. DOWNLOAD FACILITY FOR DIGITALLY SIGNED 7/12, 8A AND PROPERTY CARD – असं या पेजचं शीर्षक आहे.

प्रॉपर्टी कार्ड

फोटो स्रोत,BHULEKH.MAHABHUMI.GOV.IN

Skip पॉडकास्ट and continue reading

पॉडकास्ट
तीन गोष्टी
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आता डिजिटल स्वाक्षरीतलं प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं, याची माहिती पाहूया.

प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला या पेजवर लॉग-इन करायचं आहे. सातबारा काढताना वापरलेलं युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता. पण, जर तो लक्षात नसेल तर फोन नंबर टाकूनही तुम्ही प्रॉपर्टी कार्ड पाहू शकता.

ते कसं तर त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर Enter Mobile Numberच्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.

याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter OTPच्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत. त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

पुढे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed eFerfar, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील. यातल्या Digitally signed Property card या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

प्रॉपर्टी कार्ड

फोटो स्रोत,BHULEKH.MAHABHUMI.GOV.IN

त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड’ नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा, भूमी अभिलेख कार्यालय आणि गाव निवडायचं आहे.

गाव निवडलं की Property card fee for this village: Rs 45. असा मेसेज स्क्रीनवर येईल. याचा अर्थ या गावातील प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी 45 रुपये इतकं शुल्क आकारलं जाईल. या मेसेजखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

मग CTS नंबर टाकायचा आहे. CTS म्हणजे सिटी सर्व्हे नंबर. याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेला एक नंबर. प्रॉपर्टीशी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात. त्यानंतर CTS नंबर निवडा या पर्यायावर क्लिक केलं की तो नंबर तिथं आलेला दिसेल. त्या नंबरवर क्लिक करून तो निवडायचा आहे.

आता रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आधी 45 रुपये आपल्याला खात्यात जमा करावे लागणार आहे.

रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक केलं की MAKE ONLINE PAYMENT नावाचं एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. इथं Enter Amount समोर 45 इतका आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊ यावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर रिफंड पॉलिसीसंदर्भातल्या पेजवरील कन्फमया पर्यायावर क्लिक करायचं आहे.

प्रॉपर्टी कार्ड

फोटो स्रोत,BHULEKH.MAHABHUMI.GOV.IN

पुढे तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम यूपीआय वापरून पैसे जमा करू शकता. मी माझ्या एटीएम कार्डावरील माहिती टाकून पे नाऊ म्हटलं आहे.

त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. तो इथं टाकून सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर पेमेंट सक्सेस झाल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल. इथल्या कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आता तुम्हाला पुन्हा माहिती भरायची आहे. विभाग, जिल्हा, भूमी अभिलेख कार्यालय, गाव आणि CTS नंबर निवडायचा आहे. ही माहिती भरून झाली की खाली 45 रुपये जमा असल्याचं तुम्हाला दिसेल. मग डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड होईल.

प्रॉपर्टी कार्ड कसं वाचायचं?

मालमत्ता पत्रक असं डाऊनलोड केलेल्या प्रॉपर्टी कार्डचं शीर्षक असतं. यात सुरुवातीला गाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर नगर भूमापन क्रमांक आणि त्याचं क्षेत्र किती आहे ते चौरस मीटरमध्ये दिलेलं असतं.

त्यानंतर हा प्लॉट कुणाच्या नावे आहे ती माहिती हक्काचा मूळ धारक या पर्यायासमोर दिलेली असते.

त्यानंतर सगळ्यात खाली एक सूचना दिलेली असते. त्यात ही मिळकत पत्रिका डिजिटल स्वाक्षरीत असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही, असं नमूद केलेलं असतं.

अर्थात डिजिटल स्वाक्षरीत असल्यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येणार आहे.