तुमच्या आधारकार्डवर दुसऱ्याच कोणी सिमकार्ड घेतले नाही ना!! अशा प्रकारे घरबसल्या करा चेक

21

आधारकार्ड हे सध्याच्या काळातील महत्त्वाचे डॉक्‍यूमेंट बनले आहे. ज्याप्रमाणे आधारकार्ड चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे आधारशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.

त्यामुळे आधारशी संबंधित तुमची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.

आता मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी आधारचा वापर केला जातो. एखाद्या अनोळखी व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्ड द्वारे मोबाईल सिम घेऊन फसवणूक केल्याच्या घटनाही ऐकायला मिळत आहेत. आर्थिक आणि इतर गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार इतरांच्या आधार कार्ड द्वारे घेतलेल्या सिमकार्डचा वापर करतात. त्यामुळेच आपल्या आधार कार्डवर कोणी मोबाईल सिम तर घेतलेले नाही ना हे सतत तपासत राहणे आवश्यक आहे.

तुमच्या आधारशी किती मोबाइल सिम लिंक आहेत हे शोधणे अगदी सोपे आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांत तुमच्या स्मार्टफोनद्वारे ते शोधू शकता. तुमच्या आधार क्रमांकावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत हे शोधण्यासाठी सरकारने एक पोर्टल तयार केले आहे. याला टेलिकॉम एनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे नाव देण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे, युझर्स आपल्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात.

या पोर्टलवर, तुम्ही केवळ आधार लिंक झाल्याची माहितीच मिळवू शकणार नाही तर तुमच्या नकळत जर कोणताही मोबाइल क्रमांक तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केला गेला असेल तर त्याबाबत तक्रारही करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही तुमचे जुने आणि ते नंबर देखील आधार मधून अनलिंक करू शकता जे तुम्ही आता वापरत नाही आहात.

त्यासाठी सर्वांत आधी https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जा.
येथे निर्धारित फील्डमध्ये तुमचा मोबाइल नंबर एंटर करा.
त्यानंतर’Request OTP’ बटणावर क्लिक करा.
तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP नेमलेल्या ठिकाणी एंटर करा
तुमच्या आधार क्रमांकाशी संबंधित सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.
येथे तुम्ही वापरात नसलेल्या किंवा यापुढे आवश्यक नसलेल्या नंबरची तक्रार करू शकता आणि ब्लॉक करू शकता.