गावठाणापासून २०० मीटरमधील जमिनीला आता ‘एनए’ची गरज नाही

30

गावठाणापासून २०० मीटरच्या आत समाविष्ट गटाच्या जमीन मालकांना आता बिनशेती परवानगीची अर्थात एनएची गरज राहणार नाही. शासनाने १३ एप्रिल २०२२ राेजी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशामुळे अशा जमीन मालकांना माेठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत गावठाण मर्यादेला अगदी लागून असलेल्या शेतीत ढाबा, हाॅटेल टाकायचे असेल, पेट्राेल पंप उभारायचा असेल, तर ती जमीन अकृषक (एनए) करणे बंधनकारक हाेते. प्रत्यक्षात एनएची ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. त्यासाठी १० ते १२ वेगवेगळ्या विभागांच्या एनओसी लागतात. त्यासाठी माेठा खर्चही होताे. त्यानंतरही एनएची परवानगी दंडाधिकाऱ्यांकडून मिळेलच याची हमी नाही.एनए परवानगी मिळविणे हे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरील बनले आहे.

उपविभागीय महसूल अधिकाऱ्याकडे एनएचे अनेक प्रस्ताव दाखल हाेतात.  सामान्यांचे प्रस्ताव वर्षानुवर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून राहतात. त्यामुळे जमीन मालकाला आपलीच जमीन व्यवसायासाठी वापरता येत नाही. तुकडे बंदीतील ही अडचण शासनाने ओळखली. त्यामुळेच गावठाण मर्यादेच्या २०० मीटर परिसरातील जमिनीला आता एनएची गरज राहणार नसल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याबाबत महसूल अधिकारी यांनी प्रत्येक १५ दिवसांनी स्वत: तपासणी करून आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याबाबतचा अहवाल नियमित जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. यासंबंधी सनद देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.