पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ  2 व 3 मार्च रोजी गृह भेटीद्वारे लस देण्याचे नियोजन

46

पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Ø 1 लक्ष 59 हजार 712 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट

Ø 2 व 3 मार्च रोजी गृह भेटीद्वारे लस देण्याचे नियोजन

चंद्रपूर, दि. 27 फेब्रुवारी : जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलियोची लस देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय लसिकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जि. प. अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोज पाजून करण्यात आला.

याप्रसंगी  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मित्ताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, डॉ.गोवर्धन दुधे, निवासी वैद्यकिय अधिक्षक डॉ. हेमचंद कन्नाके उपस्थित होते.

सदर मोहीम जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मोहिमेत सुटलेल्या बालकांना 2 व 3 मार्च रोजी गृह भेटीद्वारे पोलियोचा डोज पाजण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण, शहरी आणि महानगर पालिका क्षेत्रात 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण 1 लक्ष 59 हजार 712 बालके आहेत. पल्स पोलियो लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण भागात 2059 बूथ, शहरी भागात 193 तर महानगर पालिका क्षेत्रात 302 असे एकूण 2554 बूथ करण्यात आले आहेत. बूथसाठी नेमण्यात आलेल्या पर्यवेक्षकांची संख्या 517 आहे. गृहभेटीकरीता एकूण 2867 टीमचे गठन करण्यात आले आहे. यात ग्रामीण भागात 2549 टीम, शहरी भागात 129 आणि महानगर पालिका क्षेत्रात 189 टीमचा समावेश आहे. तसेच ट्रांझिट व मोबाइल टीमची संख्या अनुक्रमे 164 आणि 117आहे.

प्रास्ताविक करतांना डॉ. गहलोत म्हणाले, भारतात 1995 पासून पल्स पोलियो लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. 27 वर्षापासून हा उपक्रम निरंतर सुरू आहे. भारतात पोलियोची शेवटची केस 14 जानेवारी 2011 रोजी आढळली होती. ही मोहिम देशात सुरुवातीपासून उत्कृष्टपणे राबविण्यात आल्यामुळे आजघडीला देशात एकही पोलिओचा रुग्ण नाही. 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलियोमुक्त घोषित केले आहे. ही देशासाठी  गौरवाची बाब आहे.

गत वर्षी जगात पोलियोचे सहा रुग्ण आढळून आले. हे सर्व अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशातील आहे. अजूनही आपल्या आसपासच्या देशात पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे पोलिओचे समुळ उच्चाटनाकरीता ही मोहिम राबविण्यात येत आहे.  सुदृढ बालके ही राष्ट्राची संपत्ती आहे. बालके निरोगी राहण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. याकरीता केंद्र व राज्य शासनातर्फे 27 फेब्रुवारी या दिवशी पोलिओ मोहीम संपूर्ण भारतात एकाच वेळी राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर मोहिमेदरम्यान पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना पोलिओचा डोज द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्यासह आरोग्य प्रशासनाने केले आहे.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. हेमचंद कन्नाके यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाचे सुभाष सोरते, प्रेमचंद वाकडे, श्री. मोते, श्री. खांडरे, श्रीमती बावनकर, श्रीमती सुत्राळे आदी उपस्थित होते.