PM-SYM : काय आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना? कुणाला मिळणार लाभ, कशी करायची नोंदणी?

60

असंघटित क्षेत्रात कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे.

निवृत्तीनंतर पेन्शन देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने ही योजना आणली आहे. ज्याचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. असंघटित क्षेत्रात काम कऱणारे जवळपास 10 कोटी लोक पुढील पाच वर्षात या योजनेचा लाभ घेऊ शकतील. यासाठी सरकारने 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. पुढील पाच वर्षात ही योजना जगातील सर्वात मोठी पेन्शन योजना होईल. ही योजना 36 राज्यात सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 46 लाख पेक्षा जास्त लोकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. तीन लाखांपेक्षा जास्त संपर्क केंद्र देशभरात आहेत.

2019-20 मधील तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल अर्थसंकल्पामध्ये म्हणाले होते की, भारताचा अर्धा जीडीपी हा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांमुळे येतो. जवळपास 42 कोटींपेक्षा जास्त असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर आहेत.

यामध्ये पथ विक्रेते (स्ट्रीट वेंडर), मध्यान्ह भोजन कामगार (मिड-डे मील वर्कर), हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर इ. या मध्ये समावेश आहे. या सर्वांना वृद्धापकाळासाठी सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा कवच प्रदान केले पाहिजे. त्यामुळेच मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. याआधी आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणल्या आहेत. त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. ज्याचे उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी आहे, ते याचा लाभ घेऊ शकतात.

अट काय आहे?
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाअंतर्गत मासिक 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणारे याचा लाभ घेऊ शकतात. 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांनी ही पेन्शन योजना घेतली आहे, त्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते. म्हणजे, 60 वय झाल्यानंतर वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल. पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास 50 टक्के रक्कम जोडीदाराला मिळेल.

प्रीमियम किती भरावा लागेल?
या योजनेअंतर्गत, वेगवेगळ्या वयोगटानुसार प्रीमियम आहे. दरमहा 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागेल. तुम्ही जितकी रक्कम या योजनेत गुंतवाल तितकीच रक्कम केंद्र सरकारकडून त्यामध्ये भरली जाईल. उदाहरणार्थ… जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. इतकीच रक्कम सरकारकडून तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल.

नोंदणी कशी करावी ? –
या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी , एखाद्याला जवळचे सामान्य सेवा केंद्र म्हणजेच CSC शोधण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागेल.

पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. तुमचा तपशील कॉम्प्युटरमध्ये टाकताच तुम्हाला तुमच्या मासिक योगदानाची माहिती मिळेल.

यानंतर सुरुवातीचे योगदान रोख स्वरूपात द्यावे लागेल. खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल.