युनिक हेल्थ आयडी काय आहे? कसा केला जातो या ID चा उपयोग

52

राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन म्हणजे काय : राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशनची (NDHM) घोषणा गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केली होती, तर नीती आयोगानं ( Niti Aayog) 2018 मध्ये याबाबत उल्लेख केला होता. याद्वारे देशातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलित केली जाणार आहे. विकसित देशांमध्ये अशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्याबाबतची सर्व माहिती संकलित केली जाते त्यामुळे आपत्तीच्या काळात गोंधळ होऊ नये. एनडीएचएम एक हेल्थ कार्ड तयार करणार आहे. त्यासाठी एक युनिक क्रमांक दिला जाईल.

ओळखकार्डामध्ये व्यक्तीची आरोग्यविषयक सर्व माहिती असते. त्या व्यक्तीला कोणता आजार आहे का, कोणती औषधे तो घेत आहे किंवा पूर्वी कोणता आजार (Medical History) होऊन गेला आहे याबाबत सर्व माहिती असते. यामुळे आपत्कालीन स्थितीत एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यास त्याचा आरोग्य कार्ड ओळख क्रमांक टाकताच त्याची सर्व आरोग्य विषयक माहिती मिळेल आणि उपचार करणं सोपं जाईल.

हा आरोग्यकार्ड ओळखक्रमांक तयार करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. केवळ आधारकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्यांना जोडून हा नवीन आरोग्य ओळख क्रमांक निर्माण केला जाईल. प्रथम आरोग्य कार्ड तयार केलं जाईल; मात्र त्याबाबत लोकांच्या मनात अनेक संशय असल्यानं नागरिकांची आरोग्य विषयक माहिती त्यांच्या संमतीनं घातली जाईल.

नवजात बालकांचा किंवा मुलांचेही आरोग्य कार्ड बनवता येतं का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे, याचं उत्तर आहे होय. यासाठी नवजात बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, तर मोठ्या मुलांसाठी आधार कार्ड आणि पालकांचा मोबाईल क्रमांक लागेल.

सध्या डिजिटल कामांवर भर दिला जात असून, कोरोना विषाणूच्या साथीनं याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य ओळख पत्र बनविण्यासाठी कुठल्याही ऑफिसात जाण्याची गरज नाही. सर्व काम ऑनलाईन करण्यात येणार आहे. तातडीच्या वेळी रुग्णालयात गेल्यास कोणतेही कागदपत्र नेण्याची गरज नाही. केवळ आरोग्य ओळख क्रमांक सांगितल्यास रुग्णाची सर्व माहिती मिळणार आहे.

कोणतेही रुग्णालय, पीएचसी किंवा नेशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी जोडलेला कोणताही आरोग्यसेवा पुरवठादार असो या संस्था कोणत्याही व्यक्तीचं आरोग्य ओळखपत्र बनवू शकतात किंवा लोक स्वतः ऑनलाईन आपलं ओळखपत्र बनवू शकतात. यासाठी या वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक आहे.

तिथं सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. यात काही अडचण आल्यास ndhm@nha.gov.in यावर आपली तक्रार, अडचण मांडता येते. त्याचं निराकरण केलं जाईल.