शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय लवकरच – जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे

46

चंद्रपूर :-
सोमवारपासून राज्यातील शाळा महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली असली तरी, जिल्हा प्रशासनाला तशा कोणत्याही अधिकृत लेखी सूचना प्राप्त झाल्या नसल्याने जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय तूर्तास बंदच राहतील. या विषयावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांनी शाळा महाविद्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. म्हणून सोमवार (२४ जानेवारी)पासून इयत्ता १ ते १२ वी पयर्ंतचे शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाचे सर्वस्तरावर स्वागत झाले. शाळा महाविद्यालयाने जोरदार तयारी केली. सर्व सुरू ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण व परीक्षेची सक्ती का? असा प्रश्न विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी उपस्थित केला होता.

शाळेतच कोरोना पसरतो का? असेही अनेकांचे म्हणणे होते. यावर गंभीर विचार करून सोमवारपासून शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. परंतु असा कोणताही आदेश जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त न झाल्याने, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय तूर्तास बंदच राहणार आहेत.

जिल्हाधिकार्‍यांचा पुढील आदेश निर्गमित होईपयर्ंत विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाईनच रहावे लागणार आहे. वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात आदेश प्राप्त झाल्यावर कोविड टास्क फोर्स व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असेही जिल्हाधिकारी गुल्हाणे म्हणाले.