राष्ट्रीय पशुधन अभियानाचा लाभ घेण्याचे सीईओचे आवाहन

45

चंद्रपूर दि. 13 जानेवारी : केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केली आहे. सदर योजनेअंतर्गत शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनेकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी-मेंढीपालनाकरिता रु. 50 लक्ष, कुक्कुटपालनाकरिता रु. 25 लक्ष, वराह पालनाकरिता रु. 30 लक्ष आणि पशुखाद्य व वैरण विकास यासाठी रु. 50 लक्ष अशी आहे. प्रकल्पाकरिता स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे.

सदर योजनेचा लाभ व्यक्तिगत व्यावसायिक, स्वयंसहायता बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दूध उत्पादक संस्था, सहजोखिम गट, सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इ. घेऊ शकतात.

योजनेच्या लाभाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून अर्ज सादर करतांना सविस्तर प्रकल्प अहवाल, पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवासी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत), छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक इ.सादर करणे अनिवार्य असून अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ,आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.

योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमुना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर तर केंद्र शासनाच्या http://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी, जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.