मूल बाजारातील हजारो क्विंटल धान्य पाण्यात

49

मूल – कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे धान, कपाशी, तूर, सोयाबिन पिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे धान्य बाजारातील शेतकऱ्यांच्या धान, सॊयाबीन, चना यासह इतर कडधान्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.बाजारातील शेडबाहेर मोकळ्या जागेत असलेल्या हजारॊ क्विंटल धानाची पोती ओली झाली आहेत. यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.

विदर्भातील सर्वात मोठी धान्य बाजरपेठ म्हणून  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या  मूल धान्य बाजाराची ओळख आहे.                                                                                                         

मूल येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) आवारात लिलावासाठी ठेवण्यात आलेली धानाची पोती (Grain Sack) अवकाळी पावसामुळे (Rain) भिजली. यात शेतमालाचे मोठे नुकसान (Loss) झाले. धान उत्पादक शेतक-यांनी बाजार समितीच्या अव्यवस्थेविरूदध रोष व्यक्त केला आहे. मंगळवारच्या रात्रो आणि बुधवारच्या पहाटे मूल तसेच तालुक्यात अवकाळी पाउस बरसला.कृषी उत्पन्न बाजार समितीत दर वेळेस अवकाळी पावसामुळे असेच धान्य भिजते. त्यासाठी कुठल्याही उपाययोजना येथे करण्यात आल्या नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. आधीच शेतमाल खरेदी होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेला धान तर व्यापाऱ्यानी विकत घेतलेला धान पाण्याने ओला झाला.

तालुक्यात आणि परिसरात धानाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे धानाची आवक मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात सुरू आहे. बाजार समितीच्या महात्मा ज्योतिबा फुले मार्केट यार्डच्या आवारात जवळपास हजारोंच्या संख्येत धानाची पोती उघडयावर ठेवण्यात आलेली आहे. बाजार समितीचे गोदामे आणि दलाल अडते यांची असलेली गोदामे हाउसफुल झाल्याने विक्री साठी आणण्यात आलेली धानाची पोते उघडयावर ठेवण्यात आलेली आहे. यातील ब-याचशा शेतमालाचा लिलाव बाकी आहे. त्यामुळे उघडयावरच्या धान पोत्यांना मंगळवारच्या रात्रो आलेल्या आणि बुधवारच्या पहाटे पडलेल्या अवकाळीचा मोठा फटका बसला.

अधिकाअधिक धान पोते अवकाळीमुळे भिजली. हवामानातील बदल लक्षात घेता ब-याचशा उघडयावरच्या धान पोत्यावर ताडपत्री सुदधा टाकलेली नव्हती. याप्रकरणी शेतक-यांनी बाजार समितीच्या अव्यवस्थेविषयी रोष व्यक्त केला आहे.गोदामे अपूरे पडत असल्याने गोदामाची संख्या वाढविण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे. मूल येथील सुरेश निकूरे या शेतक-याने 170 धानाची पोते विक्री साठी आणलेली होती. त्यातील त्यांचा बराचशा शेतमाल पावसात भिजला. हंगामातील अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे पुरते कंबरडे मोडले आहे.

धान कापणीच्या हंगामात सुदधा अवकाळी पावसामुळे धानाचे मोठे नुकसान झाले होते. आणि आता हातात आलेला शेतमाल विक्रीसाठी आणल्यानंतरही अवकाळीची वक्रदृष्टी लागली.त्यामुळे धान उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला असून कष्टाची भाकरही पदरात पडणार की नाही यांची चिंता त्याला लागली आहे.अवकाळी पावसामुळे धानाच्या प्रतवारीत मोठी घसरण झाली आहे.त्यामुळे बाजार समितीमध्ये कमी प्रतवारीच्या धानाला उठाव नसल्याने बाजार समितीच्या आवारात धानाच्या पोत्यांची मोठी साठवणूक झाली आहे. दरवर्षी समितीच्या आवारात धानाच्या पोत्यांची साठवणूक करावी लागत असल्याने आवारात बाजार समितीने मोठमोठया गोदामाची उभारणी करावी अशी मागणी धान उत्पादक शेतक-यांकडून होत आहे.

प्रतिक्रिया:- बाजार समितीच्या आवारातील धानाची पोती मोठया प्रमाणात अवकाळी पावसामुळे भिजली.त्याला बाजार समिती,दलाल आणि व्यापारी कारणीभूत आहेत.धानाचा लिलाव झाल्यानंतरही एक एक आठवडा काटा केल्या जात नाही.त्यामुळे धानाची साठवणूक येथे वाढलेली आहे. बाजार समितीमध्ये सोय होत नसल्याने शेतक-यांचे नुकसान होत आहे.

शेतक-यांची पिळवणूक थांबवण्यासाठी बाजार समितीने शेतमाल ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी.

– रूमदेव गोहणे, अध्यक्ष, तालुका काँग्रेस किसान सेल, मूल व धान उत्पादक शेतकरी, येरगाव