सहा नगरपंचायतींच्या अनारक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

38

Ø 18 जानेवारी रोजी होणार मतदान

चंद्रपूर दि. 28 डिसेंबर : सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जीवती आणि सिंदेवाही- लोनवाही नगर पंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आलेल्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार या जागांवर आता मंगळवार 18 जानेवारी 2022 रोजी मतदान घेण्यात येईल.

वरील नगरपंचायतीच्या जागांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा कालावधी 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 1 जानेवारी (शनिवार) आणि 2 जानेवारी (रविवार) या सुट्ट्यांच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाही. दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजतापासून होईल. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख छाननीनंतर लगेच म्हणजे 4 जानेवारी 2022 आहे. अपील नसेल तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असून अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिस-या दिवशी किंवा तत्पूर्वी.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख, उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी राहील. उपरोक्त जागांसाठी मतदान मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत राहील. तसेच मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजतापासून करण्यात येईल.

नेमण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी व नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची जागा :  

        सावली नगर पंचायतीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, सावली), पोंभुर्णा न.पंचायतसाठी निवडणूक निर्णय अधिकारी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी दिप्ती सुर्यवंशी आहेत. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, पोंभुर्णा), गोंडपिपरीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पं.स. सभागृह, तहसील परिसर, गोंडपिपरी), कोरपनासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजूराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आहे. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, नगर पंचायत कोरपना अभ्यासिका सभागृह), जीवतीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल आहेत. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, नगर पंचायत कार्यालय, जीवती) आणि सिंदेवाही – लोनवाही करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ  आहे. (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची जागा, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, राजीव गांधी सभागृह, तहसील कार्यालय, सिंदेवाही).

            वरील निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जाहीर केला आहे.