यश संपादन करण्यासाठी इच्छाशक्ती व एकाग्रता अंगी बाळगणे महत्त्वाचे- अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

36

चंद्रपूर दि.24 डिसेंबर: कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावयाचे असल्यास कौशल्यपूर्ण कार्यक्रिया, त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनात करिअर ग्राफ सतत उंचावत ठेवायचा असेल तर इच्छाशक्ती व एकाग्रता अंगी बाळगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित रोजगार तथा शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार  प्रणाली दहाटे, संस्थेच्या प्राचार्या श्रीमती खोब्रागडे तसेच नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

जीवनात यशस्वी प्रत्येकाला व्हायचं आहे ,असे सांगून श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, एकाग्रता आणि इच्छाशक्ती यांचा फार जवळचा संबंध आहे. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रथम ती गोष्ट करण्याची इच्छा पाहिजे. इच्छा व एकाग्रतेने यशाला गवसणी घालता येते. यावेळी श्रीमती विद्युत वरखेडकर यांनी मेळाव्यात उपस्थित उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर मेळाव्यात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुक पात्रताधारक उमेदवार यांची लेखी परीक्षा व मुलाखत घेऊन कंपन्यांमध्ये रोजगार व शिकाऊ उमेदवारी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या मेळाव्यामध्ये जवळपास 310 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

मेळाव्याच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या प्राचार्या श्रीमती खोब्रागडे,  सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती दहाटे, यांच्या मार्गदर्शनात श्री. गेडकर, श्री. शेख, श्री. लाखे यांनी अथक परिश्रम घेतले.