प्रतिक्षा यादीत असलेल्या अनुकंपाधारकांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त करून घ्यावी – जिल्हाधिकारी गुल्हाने

28

Ø जिल्ह्यात पहिल्यांदाच अनुकंपाधारकांसाठी मार्गदर्शन मेळावा

चंद्रपूर, दि. 21 डिसेंबर : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात रिक्त पदांची संख्या वाढत आहे. तसेच अनुकंपाधारकांची प्रतिक्षा यादीसुध्दा वाढत आहे. अनुकंपाची नोंदणी करतेवेळी संबंधित उमेदवाराची शैक्षणिक अर्हता आणि आजची शैक्षणिक अर्हता वेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी आपापली कागदपत्रे अद्ययावत करून घ्यावी. तसेच पदांच्या मागणीनुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केली तर नोकरीची संधी लवकर प्राप्त होऊ शकते, असे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.

 प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित अनुकंपाधारकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक प्रिती डुडूलकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अनुकंपाधारकांच्या प्रतिक्षा यादीत असलेल्यांना वर्षानुवर्षे नोकरीची वाट पाहावी लागते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, उमेदवाराने वाढीव शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे अद्ययावत न केल्यामुळे किंवा संबंधित विभागास न कळविल्यामुळे पदे भरण्यास अडचण होत आहे. विविध विभागातील जागांच्या मागणीनुसार उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्राप्त केली तर नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे आपली कागदपत्रे अद्ययावत करून घ्या. अनुकंपाधारकांनी अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केला किंवा कागदपत्रे अद्ययावत नाही केली तर नोकरीची संधी हातून जाऊ शकते.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, सद्यस्थितीत जिल्ह्यात 96 अशी पदे आहेत जी अनुकंपाधारकांच्या यादीतून भरली जाऊ शकतात. परंतु या पदाकरीता लागणारी शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे या पदांवर उमेदवार भरता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून 599 अधिपरिचारीकांची पदे, 15 औषधी निर्मात्यांची पदे अशी विविध पदे अनुकंपा यादीतून भरता येणे शक्य आहे. मात्र उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे ती पदे भरली जाऊ शकत नाही. त्यामुळे रिक्त पदे कोणती, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता कोणती, अशा बाबींची माहिती उमेदवाराला आधीच झाली तर ते आपल्या करीअरचे नियोजन करून शासकीय नोकरी मिळवू शकतात. आजच्या मेळाव्याला प्रतिक्षा यादीतील अनुकंपाधारकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत गट ‘क’ ची 274 उमेदवारांची तर गट ‘ड’ करीता 101 उमेदवारांची प्रतिक्षा यादी असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या, जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून अनुकंपाधारकांसाठी अशा प्रकारचा हा पहिलाच मेळावा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. पदांच्या मागणीनुसार उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेबाबत तसेच इतर कागदपत्रांबाबत अवगत करणे, हा मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. सर्व विभाग प्रमुखांनी प्रतिक्षा यादी अपडेट करून घ्यावी. या मेळाव्यातून गोळा होणा-या डाटाबेसमधून शासनाच्या धोरणानुसार भरती केली जाईल. उमेदवारांनीसुध्दा पदांसाठी असलेली आवश्यक अर्हता प्राप्त करावी, असे आवाहन त्यांनी केले.

  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून अधिक्षक प्रिती डूडूलकर यांनी विविध पदांसाठी असलेल्या शैक्षणिक अर्हतेबाबत उमेदवारांना मार्गदर्शन केले. तसेच उमेदवारांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अनुकंपाधारक उपस्थित होते.