मतदार नोंदणीसाठी 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

28
चंद्रपूर दि.10 मतदार नोंदणीसाठी जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन येत्या 16 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे.
मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास किंवा नोंदीमध्ये दुरूस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदविण्यासाठी त्यांना विहीत अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येतील. याकरीता ग्रामपंचायत कार्यालयात आधीच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फार्मचे नमुने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी तसचे लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकीत करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण होत आहेत त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी या कामावर भर देण्यात येणार आहे.
याच दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे ग्रामसभेत उपस्थित राहून दावे व हरकती स्विकारणार आहेत. तरी मतदार यादीत नावे समाविष्ट नसलेल्या नागरिकांना संबंधित गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.