असंघटितांना ‘संघटित’ करण्यासाठी ‘ई-श्रम’

35

असंघटितांना ‘संघटित’ करण्यासाठी ‘ई-श्रम’

ई-श्रम संकेतस्थळाच्या मदतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांची माहिती घेऊन त्यानुसार सरकार विविध योजना आणि नियम तयार करू शकेल

असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-श्रम’ संकेतस्थळाचे गुरुवारी औपचारिक अनावरण केले.  श्रमिकांमधील अत्यंत वंचित घटकाला ई-श्रम संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख आणि संघटित रूप मिळविता येणार आहे.

बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर करता येणार आहे. केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. गेल्या आठवड्यात या संकेतस्थळाच्या बोधचिन्हाचे त्यांनी अनावरण केले होते. केंद्र सरकारने देशभरातील विविध क्षेत्रातील सुमारे ३८ कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या कामगारांच्या अपघाती मृत्यूच्या प्रसंगात, त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या विम्याचे कवचाची आणि अपघातांत कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांच्या भरपाईचे लाभ देण्याची घोषणा केली आहे, असे यादव यांनी सांगितले.

संकेतस्थळावर कामगार मंत्रालय, राज्य सरकार, कामगार संघटना आणि सामाईक सेवा केंद्र  (सीएससी – सेतू) मदतीने कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. कामगारांच्या मोठ्या प्रमाणावर नोंदणीसाठी देशभरात मोहिमा आखल्या जाणार आहेत. सर्व केंद्रीय कामगार संघटना असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी यशस्वी करण्यासाठी मदत करणार आहेत.

ई-श्रम संकेतस्थळाच्या मदतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांची माहिती घेऊन त्यानुसार सरकार विविध योजना आणि नियम तयार करू शकेल. जेणेकरून सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचू शकेल. देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची मोठी संख्या पाहता सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

संकेतस्थळावर  नोंदणी कशी?

असंघटित क्षेत्रातील कामगारांना थेट संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. यासाठी १४४३४ हा राष्ट्रीय नि:शुल्क संपर्क  क्रमांक तयार करण्यात आला असून त्यायोगे कामगारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. कामगारांना आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांकाच्या साहाय्याने ई-श्रम संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. याचबरोबर जन्म दिनांक, मूळ गाव, संपर्क क्रमांक आणि सामाजिक श्रेणी यासारखी आवश्यक माहिती द्यावी लागेल. कामगारांना १२ अंकी अनोखा संकेतांक (युनिक कोड) असलेले ई-श्रम ओळखपत्र दिले जाईल, त्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.