जनतेच्या प्रेमाला तडा जाऊ देणार नाही जि.प .अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांचे प्रतिपादन मारोडा, राजोलीत नेत्र तपासणी शिबिर

82

जनतेच्या प्रेमाला तडा जाऊ देणार नाही
*जिप अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांचे प्रतिपादन
*मारोडा, राजोलीत नेत्र तपासणी शिबिर
मूल :-तालुक्यातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यांच्या प्रेमरूपी आशिर्वादाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. गावांच्या सर्वागिण विकासासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मारोडा व राजोलीत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांच्या आयुष्यात प्रकाशसंध्या निर्माण करण्याचा प्रयत्न राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शन केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले.

 

 

 

 

मूल तालुक्यातील मारोडा व राजोली येथे नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या दोन्ही कार्यक्रमाला मारोडा सरपंच भिकारू शेंडे, अनुप नेरलवार, उसराला सरपंच श्री. बंडू नर्मलवार, चंदू नामपल्लीवार, सचिन गुरनुले, डाँ. सुमेध खोब्रागडे, डॉ. किशोर भांडेकर, राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे, विजय पाकमोडे डाँ. जयश्री नारनवरे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी मारोडा येथे 461 व राजोली येथे 419 लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले असून, मारोडा व राजोली येथे शेकडो नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. गुरनुले पुढे म्हणाल्या, मूल तालुक्यातील जनतेच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आपण सदैव तत्पर राहत आहे. यापूर्वीही अनेकदा नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही शिबिर दोन वर्षे घेता आली नाही. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा नागरिकांच्या आयुष्यात प्रकाश देण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावविकासावर भर दिला आहे. यासोबत नागरिकांच्या आरोग्यदृष्टीने आम्ही मोतिबिंदू, नेत्र तपासणी शिबिर आयोजित करीत असतो. या माध्यमातून त्यांची मोफत तपासणी व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. त्यादृष्टीने मी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही संध्या गुरनुले यांनी यावेळी दिली. या तालुक्यातील जनतेने कुठल्याही स्वरूपाच्या समस्येसाठी हाक दिली तर मी धावून जाण्याचा प्रयत्न करेन आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहीन, असेही त्या म्हणाल्या.