प्रतिभावंतांनी वर्तमानातील ज्वलंत वास्तव मांडावे रत्नमाला भोयर : प्रब्रह्मानंद मडावी यांच्या ‘बफरझोन’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

58

 कविता, कथा, कादंबरी, नाटक व लेखनाचे विविध अनुबंध समाज जागृतीची प्रभावी माध्यमे आहेत. प्रतिभावंतांनी आपले जीवनानुभव अधिकाधिक समृद्ध करून वर्तमानातील वास्तव मांडावे. कवी प्रब्रह्मानंद मडावी हे ‘बफरझोन’ काव्यसंग्रहातून ज्वलंत वास्तव मांडण्यास यशस्वी ठरले, असे प्रतिपादन मूलच्या नगराध्यक्ष व लेखिका प्राचार्य रत्नमाला भोयर यांनी केले. मूल येथील कन्नमवार सभागृहात शुक्रवारी ‘बफरझोन’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक दशरथ मडावी तर प्रमुख पाहुणे तहसीलदार रविंद्र होळी, कार्यकारी अभियंता ईश्वर आत्राम, जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, वरिष्ठ सहायक वैज्ञानिक देवानंद उईके, डॉ. वामन शेळमाके, प्रा. संदीप गायकवाड, सिनेट सदस्य सुनील शेरकी, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, प्रा. विठ्ठल आत्राम व अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा कोषागार अधिकारी पेंदाम यांनी काव्यसंग्रहाच्या सामर्थ्यस्थळांवर भाष्य केले. आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांना उजागर करून कवीने समाज परिवर्तनाचा संदेश दिल्याचे सांगितले. डॉ. शेळमाके, प्रा. लोनबेले, शेरकी यांनीही आदिवासी साहित्यात प्रब्रह्मानंद मडावी यांचा दुसरा काव्यसंग्रह दखलपात्र असल्याचे सांगितले. प्रा. गायकवाड यांनी ‘बफरझोन’ शोषणाचे प्रतीक असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष मडावी यांनी ‘बफरझोन’ काव्यसंग्रहाची वैशिष्ट्ये अधोरेखित करून एकूणच आदिवासी समाजाची स्थिती व गती, परिवर्तनाची अपरिहार्यता आदी पैलुंवर प्रकाश टाकला. कवी मडावी यांनी लेखनामागील भूमिका विशद केली. कोविड काळात नि:शुल्क रूग्णसेवा करणारे डॉ. प्रवीण येरमे व डॉ. शारदा येरमे तसेच प्रसिद्ध चित्रकार भारत सलाम यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांनी सत्कार केला. स्वागतगीत राजेश संगेल, चिदानंद सिडाम, अरविंद मसराम यांनी सादर केले. संचालन प्रा. महेश गेडाम तर प्रास्ताविक प्रा. विठ्ठल आत्राम यांनी केले. अरविंद मेश्राम यांनी आभार मानले. आयोजनासाठी राजू बन्सोड, लक्ष्मण सोयाम, यश मडावी, दिनेश करकाडे, भय्याजी उईके व उलगुलान साहित्य मंचाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.