e-SHRAM card: लगेच बनवा ‘हे’ महत्त्वाचं कार्ड; तब्बल 2 लाखांपर्यंत सुविधा मिळतील मोफत; असं करा रजिस्ट्रेशन

68

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : हेअर ड्रेसर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, रिक्षाचालक, टपरी चालवणारे अशा असंघटित क्षेत्रातल्या (Unorganized sector) सगळ्या कामगारांसाठी ही एक अत्यंत कामाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने 26 ऑगस्ट रोजी असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल (e-Shram Portal) सुरू केलं आहे. या पोर्टलच्या साह्याने ई-श्रम कार्ड (e-Shram Card) तयार करणाऱ्या कामगारांना अनेक सुविधा सरकारतर्फे दिल्या जाणार आहेत. तसंच, त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. देशातल्या प्रत्येक कामगाराची नोंद याअंतर्गत केली जाणार असून, त्यामुळे कोट्यवधी कामगारांना नवी ओळख मिळणार आहे.

त्याविषयीची अधिक माहिती घेऊ या. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत देशातल्या सुमारे 38 कोटी कामगारांना 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जाणार असून, ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे. हे कार्ड संपूर्ण देशभर स्वीकारार्ह असेल.

या कार्डमुळे स्थलांतर करणाऱ्या कामगारांना ट्रॅक करणं सोपं होणार आहे. सगळ्या कामगारांचा डेटा (Worker's Data) आणि माहिती एकत्रितरीत्या सरकारला उपलब्ध होणार आहे. कामगारांनी ओळखपत्र (Identity Card) आणि आधारकार्डाच्या (Aadhaar Card) साह्याने नोंदणी केल्यावर त्यांच्या कामाच्या प्रकाराच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. त्यामुळ त्यांना योग्य त्या सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ देणं शक्य होणार आहे.

तसंच, त्यांना रोजगारासाठीही साह्य होणार आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या प्रत्येक कामगाराचा दोन लाख रुपयांचा अपघात विमा (Accident Insurance) काढला जाणार आहे. त्याचा एक वर्षाचा हप्ता सरकारकडून भरला जाणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत कामगाराचा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यास किंवा त्याला पूर्ण अपंगत्व आल्यास त्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये मिळू शकणार आहेत.

तसंच, काही अंशी अपंगत्व आल्यास या विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपये त्याला दिले जातील. हे  e-Shram कार्डसाठी नोंदणी कशी करायची? कोणत्याही इंटरनेट ब्राउझरच्या सर्च बारमध्ये जाऊन https://www.eshram.gov.in ही अधिकृत वेबसाइट उघडावी. या वेबसाइटच्या होम पेजवर “ई-श्रम पर पंजीकरण करें” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावं.

त्यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी https://register.eshram.gov.in/#/user/self यावर क्लिक करावं. सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी युझरला स्वतःचा आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाइल नंबर टाकावा लागतो. त्यानंतर कॅप्चा (captcha) लिहावा. त्यानंतर संबंधित युझरने तो कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा (EPFO) किंवा कर्मचारी राज्य विमा निगमचा (ESIC) सदस्य आहे की नाही, याचा योग्य तो पर्याय निवडावा. त्यानंतर ओटीपी मागवण्यासाठीच्या पर्यायावर क्लिक करावं. यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँक खात्याचे तपशील वगैरे माहिती भरावी आणि पुढे दिलेल्या सूचनांनुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. एखाद्या कामगाराचा मोबाइल नंबर आधार कार्डाशी जोडलेला नसेल, तरीही तो कामगार यो कार्डसाठी नोंदणी करू शकतात. ई-श्रम पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, अशा कामगारांनी जवळच्या CSC वर जाऊन बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन प्रक्रियेद्वारे नोंदणी करावी.